मी आहे पण कुणासाठी....?
मी आहे पण कुणासाठी....?
चार दिवस कुठे तरी हरवून बघा...लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील.तुमचं अस्तित्व त्यांच्या दृष्टीने तितकंच महत्त्वाचं असतं,जसं एखादं रिमझिम पावसाचं थेंब जे येताना मनाला सुखावतो, पण निघून गेल्यावर त्याचं अस्तित्व फक्त ओलसर आठवणीत उरतं.
माणूस मात्र एक भ्रम मनात बाळगत असतो."मी फारच महत्त्वाचा आहे. माझ्याशिवाय यांचं काहीही चालणार नाही."पण आयुष्य त्याला एक दिवस नकळत शिकवून जातं."तुमचं असणं आणि नसणं या जगासाठी फार काही बदलून टाकत नाही."
आपण अनेकदा लोकांच्या गरजांसाठी धावतो.
प्रेम करतो, समर्पण करतो, वेळ देतो…पण सत्य हेच आहे की,"ज्याची जेवढी गरज, त्याची तेवढीच किंमत."
तुमचा उपयोग असे पर्यंत लोक तुमचं महत्त्व जाणतात.
पण ज्या दिवशी त्यांना वाटतं की "आता मला काही अडत नाही",त्या दिवसापासून तुमचं अस्तित्व त्यांच्या आयुष्यातून दुर्लक्षित होत जातं.
हे जाणवणं कठीण असतं, वेदनादायक असतं.पण हीच हकीकत आहे.जग थांबत नाही.वेळ कुणासाठी ही थांबत नाही.जसं एखादं झाड सुकतं आणि त्यावर वसलेले पक्षी क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या झाडावर उडून जातात…तसंच काहीसं माणसांचंही असतं.
ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपलं मन मोकळं करत राहतो,तेच लोक आपल्या अनुपस्थितीत
एकदा ही मागे वळून पाहत नाहीत. त्यांच्यासाठी आपण फक्त गरजेपुरते असतो.त्यांच्या गरजा संपल्या, की आपण ही त्यांचं 'अतीत' होतो.
अशा क्षणांना स्वतःलाच प्रश्न पडतो.का माणूस इतका व्यवहाराधारित झाला आहे? का आपुलकी, नातेसंबंध, निष्ठा या सगळ्या संकल्पना इतक्या क्षणभंगुर झाल्या आहेत? पण नंतर जाणवतं हीच वास्तवाची झणझणीत जाणीव आहे. हीच ‘हकीकत’.
मात्र, या सर्वात एक गोष्ट नक्की लक्षात येते.आपलं अस्तित्व आपण स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे.दुसऱ्यांच्या गरजांच्या गणितात झिजून, आपण स्वतःलाच हरवत जातो.जो पर्यंत आपण स्वतःला स्वतः ओळख देत नाही,तो पर्यंत इतरांकडून ती अपेक्षा ठेवणं व्यर्थ ठरतं.
कधी तरी चार दिवस स्वतःसाठी हरवून बघा…तेव्हाच स्वतःला सापडाल.कधी तरी स्वतःसाठी जगा…तेव्हाच उमगेल, कोण खरंच तुमचं होतं,आणि कोण फक्त गरजेपुरता चेहरा धारण करून जगत होतं.
शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं."जर तुमचं असणं स्वतःसाठी नसेल,तर तुमचं नसणंही इतरांना फारसं जाणवणार नाही."
म्हणूनच स्वतःची किंमत ओळखा,स्वतःवर प्रेम करा,
कारण या जगाला तुमच्या नसण्याने लोकांना काही घंटा फरक पडत नाही.पण तुम्हाला मात्र तो फरक समजायला हवा.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा