शब्दांच्या पलीकडचं नातं....!


शब्दांच्या पलीकडचं नातं....!

एक गोष्ट मात्र नक्की आहे.जिथे प्रेम नसतं, तिथे गरजा वाढतात;आणि जिथे खरं प्रेम असतं, तिथे कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही.कारण प्रेम असलं की जीवन आपोआप पूर्ण वाटतं.एकमेकांच्या सहवासात राहणं, त्या क्षणात जगणं हेच खरं सुख असतं; बाकी सर्व गोष्टी गौण ठरतात.

प्रेम असलं की झोपडीसुद्धा राजमहालासारखी भासते.
कारण त्या चार भिंतींमध्ये सोनं नसतं,पण मनाचं ऊबदारपण भरलेलं असतं.जेव्हा दोन मनं एकमेकांशी घट्ट जोडली जातात,तेव्हा वस्तूंचं, पैशाचं किंवा बाह्य सौंदर्याचं काहीच महत्त्व राहत नाही.पण प्रेम नसेल, तर माणूस क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकतो.कपडे कसे आहेत, चेहरा कसा दिसतो, घर किती मोठं आहे,आणि लोक काय म्हणतील या विचारांनीच मन अस्थिर होतं.

आजच्या या झगमगाटाच्या जगात लोक प्रेम दाखवतात, पण अनुभवत नाहीत.सोशल मीडियावरचे फोटो, स्टेटस, रील्स जणू आता प्रेमाचं अस्तित्व लाईक्स आणि कमेंट्समध्ये मोजलं जातं.पण खरं प्रेम कधीच प्रदर्शन मागत नाही.ते शांत असतं, आतून जाणवतं,आणि त्याची गोडी फक्त अनुभवणाऱ्यालाच उमगते.

प्रेम हे दाखवण्याची नव्हे, तर जाणवण्याची आणि जगण्याची भावना आहे.ते एखाद्या नजरेत दडलेलं असतं,एखाद्या स्मितहास्यात उमललेलं असतं,
आणि एखाद्या साध्या स्पर्शात आपलं अस्तित्व सांगून जातं.

खरं प्रेम म्हणजे साधेपणा.ते महागड्या भेटवस्तूंमध्ये नसतं,तर वेळ देण्यात आणि एकमेकांना मनापासून ऐकण्यात असतं.ते गिफ्ट्समध्ये नसतं,तर एका “काळजी आहे तुझी” या नजरेत दडलेलं असतं.
ते कपड्यांच्या जुळवणीत नाही,तर मनांच्या जुळवणीत असतं.

प्रेम म्हणजे एकत्र राहणं हातात हात घेऊन चालणं,
एकमेकांच्या दुःखात खांदा देणं,आणि न बोलता ही मनांनी एकमेकांशी संवाद साधत राहणं.हे नातं कधीच शर्तीत बांधलेलं नसतं;ते फक्त भावना, विश्वास आणि समजूतदारपणाच्या मुळांमध्ये रुजलेलं असतं.

प्रेम असलं की माणूस बदलतो.तो अधिक संयमी, अधिक समजूतदार आणि अधिक मृदू होतो.
त्याला वस्तूंमध्ये आनंद शोधायची गरज उरत नाही,
कारण त्याचं मन एखाद्याच्या हृदयात शांत झालेलं असतं.

खरं प्रेम म्हणजे सोबत असणं.ते महागडं नाही, पण अनमोल आहे; ते मोठं नाही, पण खोल आहे.ते शब्दांनी सांगता येत नाही,पण आयुष्यभर जाणवत राहतं.

शेवटी प्रेम हेच जीवनाचं खरं वैभव आहे.ते असेल, तर झोपडीही राजमहाल वाटते;आणि नसेल,तर राजमहाल ही ओसाड भासतो.प्रेम म्हणजे हृदयातील ती शांत जाणीव “काहीही झालं तरी, हा माणूस माझाच आहे.” 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !