स्वप्नं दुसऱ्यांची आयुष्य त्याचं....!
स्वप्नं दुसऱ्यांची आयुष्य त्याचं....!
पुरुष… कुटुंबाचा आधारस्तंभ. जन्मताच त्याच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे दिले जाते. काळजावर कितीही घाव झाले, तरी त्या खांद्यांची झीज कोणीच पाहत नाही."वडील", "भाऊ", "पती", "मुलगा" या प्रत्येक भूमिकेत तो सतत देतच असतो…आपला वेळ, मेहनत, स्वप्नं आणि अनेकदा स्वतःचं आयुष्यसुद्धा.
प्रत्येक पुरुषाला एक "घर" असावं असं वाटतं जिथे तो थोडा विसावेल, स्वतःसाठी श्वास घेईल, जिथे त्याच्या अस्तित्वाला किंमत असेल. पण वास्तव तसं नसतं.
अनेक पुरुषांचं आयुष्य घरापासून दूरच जातं काहींनी सगळी तरुणाई परदेशात किंवा दूरच्या शहरांमध्ये गमावलेली असते. त्यांचं जगणंच झालेलं असतं फक्त:
“कमवा आणि पाठवा”.
बाहेर गावात दिवस-रात्र मेहनत करताना त्यांना ना वेळ मिळतो, ना चैन.कधी कधी सणाला, एखाद्या अपवादात्मक प्रसंगी, चार दिवसांची सुट्टी घेऊन घरी परतले, तरी तिथे ही निवांतपणा कुठे असतो?"मुलाचं शिक्षण", "मुलीचं लग्न", "घराचं बांधकाम", "गाडीची हप्ता", "आई-वडिलांच्या औषधांची यादी"...नवीन अपेक्षा, नवीन स्वप्नं, आणि पुन्हा एकदा त्याच्यासमोर न संपणारी जबाबदाऱ्यांची यादी.
त्या स्वप्नांना साकार करण्याच्या ओझ्याखाली तो पुन्हा घर सोडतो.पुन्हा कामावर जातो… पुन्हा एकटा… पुन्हा शांत.
दरम्यान, आयुष्य सरकतं… त्याच्या डोळ्यांपुढून तरुणपण निघून जातं.कधी काळी स्वप्न बघणाऱ्या डोळ्यांमध्ये आता थकवा असतो, पण तक्रार करायची मुभा नसते.मनातली वेदना व्यक्त करायला कुणी जवळ नसतं. कुणी ऐकायला वेळ देत नाही.
आणि अखेर, जेव्हा तो कायमचा घरी परततो, तेव्हा उरलेलं असतं वयाचं वार्धक्य आणि एक थकलेलं शरीर.
घर असतं, पण घरात जागा नसते.वेळ असतो, पण माणसं नसतात.आयुष्य असतं, पण त्यात रंग नसतात.
आणि म्हणून कुणीतरी फार मार्मिक शब्दांत हे वास्तव सांगून गेलं आहे.
"काय आणलात, असं विचारण्याआधी,काय गमावलं यावर एकदा नजर टाका…जेव्हा गेलो होतो, तेव्हा तरुण होतो,जेव्हा आलो, तेव्हा म्हातारा झालो!"
पुरुषाचं संपूर्ण आयुष्य हे एका न बोलणाऱ्या समर्पणाची, एकटेपणाची, आणि जबाबदाऱ्यांनी भरलेल्या नि:शब्द यथार्थाची कथा आहे.त्याचं दुःख कधी चर्चेचा विषय ठरत नाही. कारण तो रडत नाही, बोलत नाही, फक्त करत राहतो.
हा लेख त्या प्रत्येक पुरुषासाठी आहे.जो स्वप्नांना दुसऱ्यांच्या डोळ्यांत फुलवतो, आणि स्वतः मात्र शांतपणे झिजत राहतो.त्याच्या त्या अबोल त्यागाला, मनोमन एक वेळ सलाम.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा