पंजाब केसरी लाला लजपतराय एक महान देशभक्त
पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी असलेल्या त्यांच्या ९७ व्या स्मृतीदिनानिमित्त लेख.
*पंजाब केसरी लाला*
*लजपतराय एक*
*महान देशभक्त*
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि तेजस्वी नेते,'पंजाब केसरी लाला लजपत राय यांचा जन्म सन : १८६५ सालातील जानेवारी महिन्याच्या २८ तारखेला पंजाबमधील मोगा जिल्ह्याच्या धुडीके ग्रामात झाला. त्यांचे वडील मुंशी राधा कृष्ण हे उर्दू आणि फारसी भाषेचे शिक्षक होते.त्यांच्या आईचे नाव गुलाबी देवी असून त्या गृहिणी होत्या. .आई-वडिलांच्या सुसंस्कारात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी आदर्श विद्यार्थी जीवनाचे धडे बालपणातच लाला लजपत राय यांना दिले.शाळेमध्ये ते एक आदर्श विद्यार्थी होते.त्यांच्या विद्यार्थी देशातील गुण आजच्या विद्यार्थ्यांनी आचरणात आणले पाहिजे.लाला लजपत राय यांनी लाहोर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रथम हिसार येथे आणि नंतर लाहोर येथे वकिली सुरू केली होती.
सन : १८८८ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये त्यांची गणना जहाल नेत्यांमध्ये केली जात असे.
बाळ गंगाधर टिळक आणि बिपीन चंद्र पाल यांच्यासोबत ते 'लाल-बाल-पाल' या प्रसिद्ध त्रयीचा भाग बनले. लाल- बाल-पाल (Lal-Bal-Pal) ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तीन महान नेत्यांची त्रयी होती. लाल म्हणजे लाला लजपत राय (पंजाब),बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे जहाल मतवादी विचारांचे समर्थक होते.या नेत्यांनी बंग-भंग (बंगालची फाळणी) आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आणि देशातील लोकांना संघटित केले .
लाला लजपत राय यांना 'पंजाब केसरी' (म्हणजे'पंजाबचा सिंह') ही पदवी जनतेने दिली होती. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या महान योगदानामुळे, पंजाब आणि देशासाठी त्यांनी केलेल्या शौर्यपूर्ण कार्यामुळे, आणि त्यांच्या निर्भीड नेतृत्वामुळे लोक त्यांना आदराने 'पंजाब केसरी' म्हणत असत.हे अधिकृतपणे एका व्यक्तीने किंवा संस्थेने दिलेले पद नसून,जनतेने दिलेली प्रेमाची आणि सन्मानाची पदवी पदवी आहे .
लाला लजपत राय यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात तीव्र संघर्ष केला आणि लोकांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत केली. त्यांनी स्वदेशी वस्तूंचा वापर आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे जोरदार समर्थन केले. ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे सन : १९०७ मध्ये त्यांना अटक करून देशातून हद्दपार करण्यात आले होते.ते आर्य समाजाचे समर्थक होते आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारांनी ते प्रभावित होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आणि दयानंद अँग्लो-वैदिक शाळांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.त्यांनी अनेक अनाथाश्रम आणि शाळा स्थापन करून सामाजिक समानता व शिक्षणाचा प्रसार केला होता. सन : १९१४ ते १९२० या काळात ते युरोप आणि अमेरिकेत राहिले.अमेरिकेत त्यांनी 'इंडियन होम रुल लीग ऑफ अमेरिका' ची स्थापना केली.या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची बाजू मांडली. त्यांनी भारताच्या गरिबी आणि दुःखावर प्रकाश टाकणारे 'अनहॅपी इंडिया' हे पुस्तक लिहिले. 'यंग इंडिया' आणि 'द प्रॉब्लेम ऑफ नॅशनल एज्युकेशन इन इंडिया' ही त्यांची इतर गाजलेली पुस्तके आहेत. त्यांनी 'द पीपल' नावाचे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले होते, जे राष्ट्रीय विचारांचा प्रसार भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करीत होते.
सन : १९२० मध्ये झालेल्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि तुरुंगवास भोगला.ते अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते, त्यांनी कामगार चळवळीला प्रोत्साहन दिले. सन : १९२८ मध्ये भारतात सायमन कमिशन आले, ज्यावर एकही भारतीय सदस्य नसल्याने भारतीयांनी तीव्र आक्षेप घेतला.लाला लजपतराय यांनी या कमिशनविरोधात शांततापूर्ण मोर्चाचे नेतृत्व केले. दि. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी लाहोर येथे या मोर्चावर पोलिसांनी क्रूरपणे लाठीचार्ज केला. लालाजींनी स्वतः लाठीचार्ज झेलला आणि ते गंभीर जखमी झाले.या हल्ल्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचे आरोग्य खालावले.त्यांनी म्हटले होते: "माझ्यावर झालेले लाठीचे प्रत्येक प्रहार ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीतील अखेरचा खिळा ठरेल."याच दुखापतीमुळे दि.१७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे बलिदान भारतीय तरुणांना प्रेरणा देणारे ठरले आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी एक अमूल्य योगदान दिले.असे हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अत्यंत महत्त्वाचे व तेजस्वी जहाल नेते, पंजाब केसरी लाला लजपत राय यांना त्यांच्या ९७ व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
शिक्षण भूषण प पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बबारावजी बुंदेले,
अमरावती :८०८७७४८६०९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा