कष्टांनी घडलेलं नाव,चापलुसीपेक्षा अनमोल....!


कष्टांनी घडलेलं नाव,चापलुसीपेक्षा अनमोल....!


बूट घासून बनवलेली ओळख बूट चाटून मिळवलेल्या इज्जतीपेक्षा कितीतरी पटीने मोठी असते…
माणसाच्या आयुष्याचा खरा अर्थ कष्टांत लपलेला असतो. आपल्या हातांतले रगाडे, कपाळावरचे घामाचे थेंब आणि न थकणाऱ्या प्रयत्नांनी तयार झालेली ओळख हाच जगण्याचा शुद्ध, स्वच्छ आणि खरा आधार असतो. बूट घासून कमावलेली ओळख ही केवळ पैशांत किंवा पदांत मोजता येत नाही;तिच्यात स्वाभिमान असतो, आत्मविश्वास असतो, आणि माणूस म्हणून स्वतःला उभं करण्याची ताकद असते.

कष्टातून मिळालेली ओळख ही हळू हळू घडते, पण ती चिरस्थायी असते. कधी एखाद्याला आपले प्रयत्न दिसतात, कधी दिसत नाहीत, पण मनाला मात्र माहित असतं की आपण कमावलेलं सर्व काही आपल्या घामातून जन्मलेलं आहे. अशा ओळखीमध्ये दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. इतरांच्या कृपेपेक्षा स्वतःच्या परिश्रमाचा हात अधिक मजबूत असतो.

याउलट बूट चाटून मिळवलेली इज्जत तिची चमक बाहेरून झळाळते, पण आतून ती पोकळ असते. ही इज्जत मिळवताना माणूस स्वतःचा स्वाभिमान दरवाज्याबाहेर ठेवून जातो. दुसऱ्यांचे मन वळवण्यासाठी नम्रता नव्हे, तर चापलुसी करावी लागते.आणि
चापलुसीने मिळालेलं मान हे नेहमीच तात्पुरतं असतं. ज्यांची कृपा मिळवून आपण वर आलो, त्यांचाच एक शब्द पुरतो आणि आपण तिथून खाली येतो. अशी इज्जत कधीच आपली वाटत नाही; ती परवानगीने मिळालेली असते, अधिकाराने नव्हे.

खरी कमाई तीच जी आत्म्याला समाधान देईल.ज्यासाठी रात्री झोप लागत नाही, पण सकाळी उठताना मनात
उभारी येईल. ज्या ओळखीला संघर्षाची ढाल आहे, जिद्दीची तलवार आहे, आणि स्वाभिमानाची मूठ आहे, ती ओळख कुणी हिरावून घेऊ शकत नाही.

कष्टाची ओळख जगाला कदाचित उशिरा कळेल, पण त्या ओळखीचा प्रकाश स्वतःचाच असतो. चापलुसीची इज्जत मात्र हजार दिवे लावूनही कायम टिकत नाही.

म्हणूनच कष्टातून उभं राहिलेलं नाव हे सोन्यासारखं टिकणारं असतं,आणि चापलुसीतून मिळालेली इज्जत ही धुक्यासारखी क्षणात विरघळणारी.स्वाभिमानाने जगायचं असेल तर घामाचा मार्गच योग्य आहे;कारण तोच मनाला उठवतो, उभं करतो आणि खऱ्या अर्थाने ‘आपण’ बनवतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !