आरसा आणि माणुसकी....!
आरसा आणि माणुसकी....!
आरसा एक शांत साक्षीदार.तो आपल्या चेहऱ्यावरचं हास्य दाखवतो, ओठांवरील बनावट हसूही दाखवतो, पण मनातलं काहीच दाखवत नाही.आपण दररोज आरश्यात स्वतःला पाहतो, केस विंचरतो, चेहरा नीट करतो, पण कधी स्वतःच्या मनाकडे पाहायचा प्रयत्न करतो का?
मनात राग, मत्सर, गर्व, द्वेष…हीच ती घाण आहे जी आरशात दिसत नाही.पण हीच घाण माणसाचं खरं सौंदर्य हरवून टाकते.चेहरा कितीही सुंदर असो, पण जर मन कुरूप असेल. तर त्या सौंदर्याला काहीच किंमत उरत नाही.
कल्पना करा, जर आरसा फक्त चेहरा नाही तर मनही दाखवू शकला असता.तर कदाचित आपण स्वतःकडे पाहायला ही घाबरलो असतो.तेव्हा लक्षात आलं असतं की आपले राग, आपले कटु शब्द, आपला गर्व, आपली असहिष्णुता हे सर्व आपल्या चेहऱ्यावरील तेज कसं हिरावून नेत आहेत.
जर आरशात हे सगळं दिसलं असतं.तर कदाचित आपण रागा ऐवजी शांतता शिकली असती,द्वेषा ऐवजी प्रेम जोपासलं असतं,गर्वा ऐवजी नम्रता स्वीकारली असती.कारण कुणालाही स्वतःचं कुरूप रूप पाहायला आवडत नाही.
माणसातली माणुसकी आज हरवते आहे.कारण आपण मनाचा आरसा स्वच्छ ठेवणं विसरलो आहोत.आपण चेहऱ्यावर मुखवटे लावतो, पण मनात मात्र कटुता साठवतो.माणुसकीचा रंग पुन्हा चढवायचा असेल,
तर आधी मनाचा आरसा पुसावा लागेल. क्षमा, दया, आणि प्रेमाच्या पाण्याने.
तेव्हा चेहरा नव्हे, मन उजळेल.आणि जेव्हा मन सुंदर होतं, तेव्हा आरशात दिसतं ते फक्त रूप नसतं.
ते असतं माणुसकीचं प्रतिबिंब.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा