आयुष्य अनिश्चित आहे आहे तोवर त्याला जपा....!
आयुष्य अनिश्चित आहे आहे तोवर त्याला जपा....!
आयुष्यातील प्रत्येक क्षण अनमोल असतो आणि प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात येतो, त्याचं महत्त्व आपण कधी कधी समजू शकत नाही. आज आपल्यासोबत असलेला माणूस उद्या डोळ्यांसमोर असेल याची खात्री नसते. आज तो आपल्याला हसवतो, आपल्याला बोलतो, आपल्याला आधार देतो आणि आपल्याला समजतो, पण उद्याचं काहीही ठरलेलं नसतं. आयुष्य कधीही आपल्या अपेक्षांनुसार चालत नाही; ते अचानक बदलतं, आपले जगचं क्षणात उलथवून टाकतं आणि आपण फक्त रिकाम्या जागेकडे पाहत राहतो.
कधी कधी अचानक अशी परिस्थिती येते की आपल्याला समजतही नाही, की तो माणूस आपल्यापासून दूर गेला आणि परत येण्याची शक्यता अगदी कमी आहे.आपण गाळलेले प्रत्येक अश्रू त्याला दिसतील का,आपण केलेला हंबरडा त्याच्या कानावर पोहोचेल का, हे आपल्याला माहीत नसतं. पण इतकं नक्की की, एकदा तो निघून गेला, तो परत कधीही आपल्यासोबत राहणार नाही. आपला हा क्षण,आजची आपली ओळख, आजचं आपलं प्रेम आणि काळजी,हे सर्व परत मिळणार नाहीत.
म्हणून आहे तोवर त्याला जपायला हवे. त्याच्या छोट्या चुका हसून विसरायला हव्यात, त्याला वेळ द्यायला हवा, त्याच्याशी मायेने बोलायला हवे,त्याला प्रेमाने समजायला हवे.आजचं प्रत्येक संवाद, प्रत्येक हसणं,प्रत्येक छोटासा आनंद आणि प्रत्येक स्पर्श हे अनमोल आहे.उद्या कधीही फार उशीर होऊ शकतो, आणि त्या क्षणी आपण फक्त मागे पाहतो. आपण जे प्रेम आणि काळजी दिली, ती त्या माणसापर्यंत पोहोचली आहे का, हे कधीच ठरवता येत नाही.
आपण नंतर फक्त कावळ्या जवळ बसून त्याला शोधत बसतो, पण तो परत भेटेल याची कोणतीही खात्री नसते. त्याच्याशिवाय आयुष्य कधीही तसे पूर्ण वाटत नाही, आणि आपण जाणतो की आपण खूप काही हरवलंय, जरी ते लक्षात येणं उशीराने होतं. म्हणून आहे तोवर त्याला जपणं, त्याच्याबरोबर वेळ घालवणं, त्याच्यासाठी राहणं, त्याच्यावर प्रेम करणं हेच खरे सुख आहे.
आयुष्य खूपच अल्प आहे, वेळ कधीच थांबत नाही, आणि आपल्याला कधीही सांगता येत नाही की उद्या कोणत्या माणसाशी आपण बोलू शकणार आहोत, हसू शकणार आहोत किंवा त्याच्या जवळ राहू शकणार आहोत. त्यामुळे आज आहे तो, आजच आपल्याबरोबर आहे, आणि आजच त्याला जपणं महत्वाचं आहे. प्रत्येक क्षण जपा, प्रत्येक स्पर्श जपा, प्रत्येक हसणं जपा, प्रत्येक शब्द जपा, कारण हे क्षण एकदाच मिळतात आणि परत कधीही येणार नाहीत.
आहे तोवर त्याला जपा, त्याच्या छोट्या चुका विसर, त्याला वेळ दे, मायेने बोल, कारण हेच खरे प्रेम आहे, हेच आयुष्याचं खरे सौंदर्य आहे, आणि हेच आपल्याला भविष्यात मागे पाहताना खूप काही सांगतं, की आपण आज जे काही दिलं ते महत्वाचं आणि अनमोल होतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा