आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण..
आधनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या दि.२५ नोव्हेंबर २०२५ ला ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त लेख .
----------------------------------------------
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
यशवंतराव चव्हाण
एक थोर स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांना दि.२५ नोव्हेंबर २०२५ ला असलेल्या ४१ व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
यशवंतराव चव्हाण यांचे निधन दि.२५ नोव्हेंबर १९८४ रोजी नवी दिल्ली येथे झाले. तेव्हा ते ७१ वर्षांचे होते. त्यांचे समाधीस्थळ प्रीतीसंगम कराड येथे आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सन १९१३ सालातील मार्च महिन्याच्या १२ तारखेला सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र येथे गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे त्यांच्या बालपणीच निधन झाले. त्यामुळे त्यांचे बालपण संघर्षमय गेले.शिक्षण घेत असतानाच त्यांनी भारतीय स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला.सन : १९३२ मध्ये त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.त्यांनी बी.ए.आणि एल.एल.बी. .पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ते राजकारणात यशस्वी होऊ लागले .दि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान अनमोल आहे. त्यांनी पंचायत राज संस्था बळकट करण्यावर, सहकार चळवळीला प्रोत्साहन देण्यावर आणि औद्योगिक विकासावर लक्ष केंद्रित केले होते. सन : १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर त्यांना केंद्र सरकारमध्ये बोलावण्यात आले आणि ते भारताचे संरक्षण मंत्री बनले.संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी भारतीय लष्कराचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी आणि आधुनिकीकरणासाठी अतिशय मोलाचे कार्य केले.त्यांनी गृहमंत्री,परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि अर्थमंत्री यांसारखी महत्त्वाची केंद्रीय पदे भूषविली.त्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्य जोपासण्याचा नेहमीच प्रयत्न केला.राजकारणासोबतच, ते एक उत्तम लेखक आणि साहित्यप्रेमी सुद्धा होते.'युगांतर', 'सह्याद्रीचे वारे' हे त्यांचे प्रसिद्ध साहित्य आहे..त्यांनी राजकारण, साहित्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविला.
त्यांच्या नावाने पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संस्था आहे.त्यांचा वारसा आजही प्रगतीशील आणि आधुनिक महाराष्ट्रासाठी प्रेरणास्रोत आहे .
यशवंतराव चव्हाण यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' असे म्हटले जाते कारण त्यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनीच नव्याने स्थापन झालेल्या राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकासाचा पाया रचला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये त्यांनी मुत्सद्दीपणाने आणि कौशल्याने निर्णायक भूमिका बजावली. त्यांनी तत्कालीन कठीण परिस्थितीत,विद्वेषाचे वातावरण संपवून सामंजस्य आणि मैत्रीचे वातावरण निर्माण करून महाराष्ट्राचा 'मंगल कलश' आणला. त्यांनी समतोल विकासाचे तत्त्वज्ञान स्वीकारले. विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला जावा, यावर त्यांचा भर होता. त्यांनी महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक धोरणाचा केवळ पायाच घातला नाही, तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकारी संस्थांचे मजबूत जाळे निर्माण केले. सहकार चळवळ वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घालण्याचा आणि शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून श्रमिकांचा शहरांकडे होणारा लोंढा थोपविण्याचा विचार त्यांनी मांडला.त्यांनी प्रशासनाला केवळ कायदा व सुव्यवस्था या स्वरूपात न ठेवता, विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखली आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या धोरणांचा केंद्रबिंदू होता.त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील 'उत्तम' माणसे हेरली आणि गुणी माणसांचे, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले. यामुळे महाराष्ट्राची ओळख एक प्रगतिशील राज्य म्हणून निर्माण झाली.ते उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व तर होतेच, पण त्यासोबतच ते रसिक व साहित्यिक देखील होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृतीचे ते जनक होते, ज्यामुळे मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या विकासाला चालना मिळाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकीय,आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची सुनियोजित आणि प्रगतीशील रचना केली, म्हणूनच त्यांना 'महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात .
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने स्थापन झालेल्या विविध संस्था आहेत .
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), नाशिक महाराष्ट्रातील एक प्रमुख मुक्त विद्यापीठ,यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे हे महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र आहे,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था आहे.यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे) येथे आहे .यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई येथे आहे .यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी (पुणे) एक मोठे रुग्णालय आहे. यशवंतराव चव्हाण जीवनकार्य संशोधन केंद्र हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंतर्गत कार्यरत असून त्यांच्या कार्यावर संशोधन करणारे केंद्र आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने विविध क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार दिले जातात .स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिला जातो . हा पुरस्कार प्रौढ वाड्.मय, बाल वाड्.मय,आणि प्रथम प्रकाशन यांसारख्या विविध विभागांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जातो.
हा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये तसेच सामाजिक-आर्थिक या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तीला दिला जातो.यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक
यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे दिला जातो. हा पुरस्कार महाराष्ट्रात खालील चार क्षेत्रांत असाधारण व भरीव कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तीस किंवा संस्थेस दिला जातो .कृषी, औद्योगिक, समाजरचना , व्यवस्थापन प्रशासन पारितोषिक.यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातर्फे दिला जातो . हा पुरस्कार पंचायत राज संस्थांमधून (जिल्हा परिषदा, पंचायत समित्या) प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जातो .
यशवंतराव चव्हाण यांचे प्रकाशित साहित्य विविध पुस्तके,भाषण संग्रह आणि लेखांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. " कृष्णाकाठ " हे त्यांचे आत्मचरित्र असून यात त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आणि सातारा जिल्ह्यातील सुरुवातीच्या वर्षांची माहिती दिली आहे.
" ऋणानुबंध " हा त्यांचा अनुभव व आठवणींचा संग्रह आहे." सह्याद्रीचे वारे"हा त्यांच्या निवडक भाषणांचा संग्रह आहे,युगांतर इ .त्यांच्या साहित्यात त्यांचे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विचार दिसून येतात.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या ४१ व्या स्मृतिदिना निमित्त अभिवादन ॥
यशवंतराव । आज स्मृतिदिन ।
करांनी वंदन । कोटी कोटी ॥
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
जीवन गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.८०८७७४८६०९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा