भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे संविधान




दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी असलेल्या
संविधान दिनानिमित्त लेख.
----------------------------------------------

     भारतीय संविधान जगातील 
         सर्वात मोठे संविधान

              भारतीय संविधान हे लिखित स्वरूपातील जगातील सर्वात मोठे संविधान आहे.ते भारताला एक सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित करते.भारतीय संविधानाला दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने ते स्वीकारले,म्हणून या दिवसाला 'संविधान दिन' (Constitution Day) म्हणून ओळखले जाते.सविधान दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा ॥
        भारतीय संविधानाच्याअंमलबजावणीची तारीख दि . २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली .ज्याला आपण 'प्रजासत्ताक दिन' (Republic Day) म्हणून साजरा करतो.
.          भारतीय संविधानाची निर्मिती संविधान सभेने केली. डॉ.राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते,संविधान तयार करण्यासाठी सुमारे दोन वर्षे,अकरा महिने आणि अठरा दिवस लागले.भारतीय संविधान तयार करण्यासाठी नेमलेल्या संविधान सभेची सुरुवातीची एकूण सदस्य संख्या ३८९ होती.भारताच्या फाळणीनंतर दि.१५ ऑगस्ट १९४७ ला ही संख्या कमी होऊन २९९ झाली.या २९९ सदस्यांनीच भारतीय संविधानावर स्वाक्षरी केली आणि ते तयार केले.
         संविधानाची सुरुवात' प्रस्तावना' (उद्देशिका) पासून होते,जी संविधानाचे सार आणि उद्दिष्टे स्पष्ट करते.'आम्ही भारताचे लोक' (We, the People of India) प्रस्तावना या शब्दांनी सुरू होते,ज्यातून संविधानाचा अधिकार हा भारताच्या जनतेकडून प्राप्त झाला आहे, हे स्पष्ट होते.मूळ संविधानात ३९५ कलमे (Articles), २२ भाग (Parts) आणि आठ अनुसूची (Schedules) होत्या.सध्या संविधानात सुमारे ४७० हून अधिक कलमे,२५ भाग आणि बारा अनुसूची आहेत.भाग तीन मध्ये नागरिकांसाठी सहा मूलभूत हक्कांची (उदा. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क) हमी दिली आहे.भाग ४-अ मध्ये नागरिकांसाठी अकरा मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे.राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (DPSP)भाग 4 मध्ये आहे.राज्याने धोरणे तयार करताना पाळावयाच्या तत्त्वांचा समावेश आहे.भारताने ब्रिटनच्या धर्तीवर संसदीय लोकशाही शासनप्रणालीचा स्वीकार केला आहे.भारताने केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांचे वाटप करणारी संघराज्य प्रणाली  स्वीकारली आहे.संविधानाने न्यायपालिकेला कायद्याचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार दिला आहे,ज्यायोगे ती संविधानाचे रक्षण करते.
        भारतीय संविधानात अनेक तरतुदी विविध देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत (उदा. अमेरिका, आयर्लंड, कॅनडा).१९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेत' समाजवादी', 'धर्मनिरपेक्ष' आणि 'अखंडता' हे शब्द जोडले गेले. सरकार कोणत्याही एका धर्माला 'राजधर्म' मानत नाही आणि सर्व धर्मांना समान वागणूक देते. धर्मनिरपेक्षता महत्वाची मानलेली आहे. संविधानाचे १८ वर्षे वयाच्या सर्व नागरिकांना कोणताही भेदभाव न करता मतदानाचा हक्क दिला आहे.
        कलम ३६८ नुसार संविधानात बदल (घटनादुरुस्ती) करण्याची तरतूद आहे.भारतात सर्वोच्च न्यायालय हे शीर्षस्थानी असलेली एकात्मिक न्यायव्यवस्था आहे.संविधानाने नागरिकांना विचार,अभिव्यक्ती, विश्वास,धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे.भाग १८ मध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक आणीबाणीच्या तरतुदी दिल्या आहेत. संविधानामुळे देशात द्विगृही संसद (लोकसभा आणि राज्यसभा) अस्तित्वात आहे. संविधान राष्ट्रीय एकात्मता आणि विविधता जपण्याचे उद्दिष्ट ठेवते.भारताने नागरिकांसाठी 'एकल नागरिकत्वा'ची तरतूद केली आहे. हे एक गतिमान आणि 'जीवंत दस्तऐवज' आहे, जे बदलत्या काळानुसार घटनादुरुस्तीद्वारे विकसित होत राहते.
        भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. कारण ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या समितीवर भारताच्या संविधानाचा मसुदा (draft) तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी होती.मसुद्यावर झालेल्या प्रत्येक चर्चेत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण,युक्तिवादात्मक आणि निर्णायक भूमिका घेतली. मसुदा समितीतील अन्य सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे मसुदा तयार करण्याची बहुतांश जबाबदारी त्यांनी एकट्याने समर्थपणे पार पाडली.त्यांनी मसुद्यातील प्रत्येक कलम,तरतूद आणि संकल्पना यावर सखोल चर्चा केली आणि अंतिम रूप दिले.त्यांनी जगातील अमेरिका,इंग्लंड,आयर्लंड,कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशातील संविधानांचा सखोल अभ्यास केला.या अभ्यासातून त्यांनी भारतीय परिस्थितीसाठी उपयुक्त ठरतील अशा उत्कृष्ट तरतुदी आणि संकल्पना निवडल्या आणि त्यांचा समावेश भारतीय संविधानात केला.
सामाजिक न्याय आणि समानतेवर त्यांचा ठाम विश्वास होता.त्यांनी अस्पृश्यता निवारण, मागासलेल्या वर्गांसाठी आरक्षण, मूलभूत अधिकार आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांसारख्या तरतुदींच्या समावेशावर विशेष भर दिला.या तरतुदींमुळे भारतीय संविधान सामाजिक बदल घडवून आणण्याचे एक प्रभावी साधन बनले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या प्रत्येक भागावर झालेल्या वादविवादात  तर्कशुद्ध आणि कायदेशीर दृष्टिकोन मांडला.त्यांच्या उत्कृष्ट बुद्धिमत्ता,कायद्याचे सखोल ज्ञान आणि दूरदृष्टीमुळे संविधानाची रचना मजबूत आणि चिरस्थायी बनली.या सर्व योगदानामुळे, विशेषता संविधान मसुदा समितीचे नेतृत्व आणि सामाजिक न्यायावर आधारित संविधानाची निर्मिती केल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय घटनेचे शिल्पकार' ही उपाधी यथार्थपणे प्राप्त झाली आहे. भारतीय संविधान दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा॥

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर   
     साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त 
                 साहित्यिक
      प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, 
     अमरावती.८०८७७४८६०९.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !