आपला वार्डातील नगरसेवक कसा असावा ?


आपला वार्डातील नगरसेवक कसा असावा ?

निवडणुकीचा माहोल सुरू झाला की प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक आणि प्रत्येक घरात एकच चर्चा रंगू लागते या वेळेस आपल्या वार्डातील नगरसेवक कसा असावा? कारण नगरसेवक हा केवळ पद धारण करणारा नेता नसतो; तो आपल्या परिसरातील प्रत्येक कुटुंबाचा आश्रय,प्रत्येक स्वप्नांचा रक्षक आणि प्रत्येक अडचणीच्या क्षणी धावून येणारा घरचा माणूस असतो.लोकांच्या मनात त्याच्याबद्दल असलेल्या अपेक्षा शब्दांत सांगण्याइतक्या साध्या नसतात; त्या अनुभूतीतून, विश्वासातून आणि रोजच्या जीवनातील अनुभवातून जन्म घेतात.

खरा नगरसेवक तोच, जो निवडणुकीच्या काळात नव्हे तर वर्षभर लोकांच्या सोबत राहतो. ज्याच्या पावलांना आपल्या गल्लीतील मातीची ओळख असते, ज्याच्या कानांनी लोकांच्या वेदना ऐकण्याची सवय केलेली असते, आणि ज्याच्या हृदयात प्रत्येक नागरिकाच्या समस्येबद्दलची खरी काळजी असते.अशा व्यक्तीला जनता मनापासून स्वीकारते. आकर्षक भाषणांपेक्षा संकटाच्या क्षणी दिलेला हात अधिक मौल्यवान ठरतो. शब्दांनी नव्हे तर कृतीतून व्यक्त होणारी माणुसकी लोकांच्या मनात खोलवर घर करते.

नगरसेवक म्हणजे आपल्या घरातीलच एक व्यक्ती
एखाद्या आईच्या डोळ्यात दाटलेले अश्रू पाहून तत्काळ मदतीला धावणारा, एखाद्या मजुराच्या तुटलेल्या पायवाटेवर उभा राहून त्याला मार्ग दाखवणारा, आणि एखाद्या तरुणाच्या चुकलेल्या स्वप्नांना नवी दिशा देणारा. हे पद फक्त रस्ते, गटारे किंवा विकासाच्या निधीने मोजले जात नाही; ते मोजले जाते विश्वासाच्या नात्याने, माणुसकीच्या उबेतून आणि लोकांवरच्या निरपेक्ष प्रेमातून.

आपल्या वार्डातील नगरसेवक असा हवा, की ज्याच्या वागण्यात प्रामाणिकपणा असेल, शब्दांमध्ये सच्चेपणा असेल आणि कृतीत जबाबदारीची जाणीव असेल. जो कामाचे श्रेय स्वतःकडे न घेता, ते लोकांच्या सहकार्याला अर्पण करेल. ज्याचा चेहरा निवडणुकीच्या पोस्टरवरूनच नव्हे, तर लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांवर उपाय शोधताना दिसेल. जो स्वतःला अधिकारी नव्हे तर सेवक मानून काम करेल.लोकांचा, परिसराचा, आणि समाजाचा.

लोक असा नगरसेवक शोधतात, ज्याच्याकडे मोठी आश्वासने नसतात, पण जेव्हा छोट्या-छोट्या कृतीतून मोठा बदल होताना दिसतो. जो भेदभावाची रेषा आखत नाही, तर सर्वांना आपुलकीने जवळ घेतो. जो मत मागण्यासाठी नव्हे, तर मनं जिंकण्यासाठी मार्गक्रमण करतो. ज्याची उपस्थितीच नागरिकांना आश्वस्त करते की “आपली काळजी घेणारा एखादा आहे… आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”

निवडणुकीत यश त्या व्यक्तीलाच मिळते, ज्याने आधीच जनतेच्या हृदयात आपली जागा निर्माण केलेली असते. कारण मतपेट्यांचा निकाल आकड्यांनी होत नाही; तो ठरतो लोकांच्या आशीर्वादांनी, त्यांच्या विश्वासाने आणि त्यांच्या प्रेमाने.

आणि म्हणूनच, आपल्या वार्डातील खरा नगरसेवक असा असावा.जो शहर बदलण्याची महत्त्वाकांक्षा नाही, तर माणसांच्या जीवनात प्रकाश आणण्याची जबाबदारी अंगीकारतो. असा नगरसेवक लोकांनी निवडून द्यावा, जो त्यांच्या स्वतःच्या गुणांचा प्रतिबिंब असेल.सच्चा, साधा, नम्र आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेला. जो लोकांचे प्रश्न सोडवताना फक्त नेता नसतो, तर त्यांचा आधार, त्यांचा विश्वास आणि त्यांच्या आशांचा किरण बनतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !