टीकेच्या जखमांतून जन्मते ताकद.....!
टीकेच्या जखमांतून जन्मते ताकद.....!
निंदक… हे शब्द मनाला दुखावतात, पण आयुष्याचा खोल अर्थ समजून घेतला तर लक्षात येतं की निंदकांशिवाय आपली वाटचाल कधीही मजबूत होऊ शकत नाही. त्यांच्या कटू बोलण्यात, त्यांच्या टोमण्यांमध्ये आणि त्यांच्या नजरेत दडलेला हेवा हे सगळं आपल्याला थांबवण्यासाठी नसतं, तर उलट आपली गती वाढवण्यासाठी असतं.
आपल्याविषयी कुणी चुकीचं बोलतं, उगाच दोष लावतो, पाठिमागे कुजबुजतो तेव्हा मनात सल निर्माण होते. पण खरी गोष्ट अशी आहे की त्या सलच आपल्याला बदलायला लावते.माणूस जिथे जखमी होतो, तिथूनच तो ताकद उभी करतो.निंदकांचे शब्द जरी विषारी असले तरी त्या विषातूनच आपल्या जगण्याची प्रतिकारशक्ती तयार होते.
जसं गल्लीतील दोन-चार डुकरांशिवाय गल्लीची स्वच्छता ध्यानातच येत नाही.कारण ती घाणच आपल्याला साफसफाई करण्यास भाग पाडते… तसंच जीवनात दोन-चार निंदक नसतील तर आपण स्वतःकडे पाहायला, स्वतःला सुधारायला, स्वतःला उभं करायला कधी शिकणारच नाही.
त्यांचे शब्द म्हणजे आरसा कधी वाकडा, कधी तिरपा, पण तरीही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा काही भाग त्यात आपल्याला दिसतोच.कधी त्यांच्या टोमण्यांतून आपला अहंकार तुटतो,कधी त्यांचा हेवा पाहून आपल्याला आपल्या यशाची जाणीव होते,आणि कधी त्यांची टीका ऐकून आपण स्वतःची पावलं अधिक ठामपणे टाकतो.
निंदकांचं काम म्हणजे बोलणं.आपलं काम म्हणजे चालत राहणं.त्यांना तुम्हाविषयी जितकं वाईट बोलता येईल तितकं बोलू द्या.कारण जेव्हा तुम्ही उंच भरारी घेत असता तेव्हा खाली उभे असलेले लोकच आवाज करतात.जे तुमच्या मागे आहेत, तेव्हाच ते आवाज करतात.समोर धावणारा कोणीच मागे बघत बोलत नाही.
निंदकांमुळेच आपण शिकतो.कधी शांत राहायचं,
कधी दुर्लक्ष करायचं,कधी आपली ताकद सिद्ध करायची,
आणि कधी स्वतःचा मार्ग अजून स्वच्छ करायचा.
खरं तर निंदक हे आपल्या आयुष्याला धार देणारे शिल्पकार आहेत.ते आपल्या मनाला थोडं दुखावतात, पण आत्म्याला मजबूत करतात.ते शब्दांनी आपल्यावर वार करतात,पण त्या वारांमधूनच आपण अजून कठीण, अजून सजग, अजून सक्षम बनतो.
म्हणून निंदकांची भीती बाळगू नका.त्यांच्या बोलण्याला उत्तर देत बसू नका.ते बोलू द्या…तुम्ही मात्र वाढत राहा.
कारण शेवटी निंदक तुमचं जगणं थांबवू शकत नाहीत,
पण तुमची जिद्द मात्र त्यांच्या आवाजाला शांत करून टाकू शकते.तुमचा प्रकाश त्यांना अस्वस्थ करतो…आणि म्हणूनच ते बोलतात.त्या प्रकाशाला अधिक उजळू द्या.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा