कष्टाचे पैसे देवाचा आशीर्वाद आणि लुबाडलेले धन लोकांचा शाप....!
कष्टाचे पैसे देवाचा आशीर्वाद आणि लुबाडलेले धन लोकांचा शाप....!
कष्टाच्या पैशात देवाचा आशीर्वाद दडलेला असतो. कारण कष्ट म्हणजे प्रामाणिकतेची, संयमाची आणि धीराची परीक्षाच. आपण घाम गाळून मिळवलेला प्रत्येक पैसा केवळ आर्थिक स्थैर्य देत नाही,तर आपल्या
आत्म्याला समाधान ही देतो. कष्टातून मिळालेला तुकडा-तुकडा हा स्वाभिमानाचा असतो. तो आपण उंच मानेने खर्च करतो, कारण त्याच्या मागे आपली मेहनत, जागलेली रात्र, केलेले त्याग आणि सांभाळलेली जबाबदारी असते. अशा पैशात देवाचा आशीर्वाद असणारच, कारण तो पैसा सत्याच्या मार्गाने, लोकांच्या हितासाठी आणि स्वतःच्या प्रामाणिक श्रमांवर उभा असतो.
पण याच्या पूर्ण उलट, लुबाडलेल्या पैशात लोकांचा शाप दडलेला असतो. दुसऱ्याचे हक्क हिरावून घेऊन, कपटाने किंवा फसवणुकीने मिळवलेले धन कधीच सुख देत
नाही.अशा पैशाला चमक असते, पण उब नसते; तो हातात येतो, पण शांतता हिरावून नेतो. कारण त्या प्रत्येक रुपयामागे एखाद्याचं दुःख दडलेलं असतं, एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू मिसळलेले असतात. लोकांचा निःशब्द राग, त्यांचा मनातून निघालेला शाप असा पैसा अखेर नष्ट करतो.कधी नात्यांनी, कधी आरोग्याने, तर कधी मनःशांतीने.
मानवाने कितीही प्रगती केली, कितीही संपत्ती जमवली, तरी शेवटी माणुसकीची किंमत सर्वात मोठी असते. कष्टाने मिळवलेला छोटासा घास ही अमृतासारखा गोड लागतो, पण अन्यायाने मिळवलेला मेजवानीचा थाळ ही मन विषारी करून टाकतो.म्हणूनच म्हटलं जातं “कष्टाची कमाई देवाच्या कृपेची; आणि लुबाडलेले धन विनाशाची पायरी.”
शेवटी सुख तेच, जे सत्यावर उभं असतं;आनंद तोच, जो परिश्रमातून जन्म घेतो;आणि आशीर्वाद तोच,जो
आपल्या प्रामाणिक जगण्यातून मिळतो.कष्टाचा मार्ग कठीण असतो, पण तोच खरा आहे…आणि त्या मार्गावरचा प्रत्येक पाऊल देवाच्या आशिर्वादाने उजळलेलाच असतो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा