हुशार जगात मनाची उब जपणारे लोक...!
हुशार जगात मनाची उब जपणारे लोक...!
कधी कधी अंतर्मनात एक हलकीशी जाणीव डोळ्यात पाणी आणून जाते.या जगात बुद्धीने जगणारे लोक खूप असतील, परंतु हृदयाने जगणारे मात्र फार थोडे असतात… आणि म्हणूनच ते अधिक विलक्षण भासतात.
बुद्धीचा वापर करणारे लोक निश्चितच हुशार, तर्कशुद्ध आणि व्यवस्थित विचार करणारे असतात. ते प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्यातील फायदा, तोटा, शक्यता आणि परिणाम यांचं अचूक गणित मांडतात. बऱ्याच वेळा त्यांच्या निर्णयांच्या पहिल्याच ओळीत ‘मी’ असतो. त्यात चूक काही नाही, पण त्या मोजमापाच्या गणनेत भावना हरवतात, आणि त्या तर्कशुद्ध मार्गावर कुणाचं मन दुखावलं जातंय का, हे त्यांच्या नजरेतून सुटतं.
पण मनाने जगणारी माणसं?त्यांचं जगणं अगदी वेगळ्या वाटेवरून चाललेलं असतं.ते आधी स्वतःचा विचार करत नाहीत; ते आधी विचारतात.“समोरच्याला कसं वाटेल?”
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू ठेवण्यासाठी ते स्वतःच्या वेदना शांतपणे बाजूला सरकवतात.त्यांच्या नजरेत आपुलकीचा स्नेह असतो, संवादात ऊब असते आणि नात्यांना जपण्याची नाजूक, तरीही दृढ अशी कला त्यांच्या मनात रुजलेली असते.
मनाने वागणाऱ्या लोकांना अनेकदा जग भोळे म्हणतं.
परंतु खरं पाहिलं तर ते भोळेपण नसतं ती असते शुद्ध माणुसकी.कारण अशा लोकांना जिंकण्यात नव्हे, तर जोडण्यात आनंद मिळतो.त्यांना स्वतःसाठी काही मिळवण्याची हाव नसते;समोरच्याला सुख मिळावं, त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटावं हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं यश असतं.
अशा लोकांची किंमत कधी कधी जग कमी करतं, पण काळ मात्र कधीच करत नाही.कारण आयुष्याच्या कठीण वळणांवर, धकाधकीच्या गर्दीत, नात्यांच्या थंडगारपणात
असंच कुणाचं हृदयाने जगणारं व्यक्तिमत्त्व आपल्याला उबदार आश्रयासारखं भेटतं.त्यांचं बोलणं साधं असतं, पण स्पर्श मात्र थेट मनावर उमटतो.त्यांची सोबत क्षणभराची असली तरीही आयुष्यभराची शिकवण देऊन जाते.
बुद्धी आपल्याला यशाचा मार्ग दाखवते,परंतु मन मन आपल्याला जाणिव देते.बुद्धी सांगते काय योग्य-अयोग्य,
पण मन सांगतं काय सुंदर, काय मानवतेचं.
म्हणूनच खरं…या जगाला बुद्धीने हुशार लोकांची कमी नाही,परंतु हृदयाने चांगले लोक मात्र खरोखरच दुर्मिळ झाले आहेत.जग बदलण्याची ताकद डोक्याकडे असते,पण मन बदलण्याचं सामर्थ्य ते केवळ मनाने जगणाऱ्या लोकांकडेच असतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा