दु:खाच्या पानानंतरचा नवा धडा....!
दु:खाच्या पानानंतरचा नवा धडा....!
एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की…
मानसिक जग बदलून जातं. शांतपणे, संयमाने, प्रेमानं जगणारा माणूसही एका क्षणी स्वतःचा वेदनेचा काठ ओलांडतो. तो आवाज करत नाही, राग व्यक्त करत नाही, पण मनाच्या तळाशी कुठेतरी काहीतरी कायमचं तुटून जातं. त्या तुटलेल्या क्षणाला आवाज नसतो, रंग नसतो.फक्त हृदयाचा न बदलणारा निर्णय असतो.
मनाने कितीही चांगलं राहायचं ठरवलं तरी
विश्वासघाताचं दुःख खोलवर बोचतंच. पण खरा मोठेपणा इथेच दिसतो.ज्याने आपल्या भावनांची किंमत ओळखली नाही, त्याच्यासाठी आपण आयुष्यभर रडावं असं नाही; पण आपल्या चांगुलपणाने, आपल्या शांत ताकदीने त्याला स्वतःच पश्चातापाने रडायला लावावं. हा बदला नसतो, ही आपल्या चारित्र्याची ताकद असते.
आयुष्यात वाईट काळ आला की पुस्तक बंद करण्याची घाई करू नये, कारण त्या पानाच्या पुढे कितीतरी सुंदर धडे आपली वाट पाहत असतात. जीवनात प्रत्येक दुःख, प्रत्येक अपमान, प्रत्येक अन्याय हे आपल्याला कमकुवत करण्यासाठी नसतात; ते आपल्याला अधिक समर्थ, अधिक शहाणं, अधिक मूल्यवान बनवण्यासाठी असतात.कधी कधी अपमान सहन करणं ही कमजोरी नाही.अगदी उलट आहे. अपमान सहन करणं म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण दाखवणं. जग बदलू शकतं, लोक बदलू शकतात, पण आपल्या मनाचं संतुलन आपणच जपायचं असतं.
लोक कसे वागले, काय बोलले, काय विचार केला.यात स्वतःला झिजवत राहिलं तर आयुष्य हातातून निसटतं. त्यापेक्षा आपण पुढे कसं वागणार, स्वतःला कसं उंचावणार,आपली वाट कशी घडवणार याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं. कारण जग आपल्याला कितीही दुखावलं तरी, पुढची पायरी आपणच ठरवायची असते.
आणि हो… एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की, माणूस अत्यंत प्रिय नातेसंबंधही शांतपणे सोडून देतो. आवाज न करता. दोष न देता. कारण त्याला ओरडण्यापेक्षा शांतपणे दूर जाणं अधिक योग्य वाटतं.
असं नातं सोडताना मन थकलेलं असतं, पण आत्मा मात्र मुक्त झालेला असतो.
सहनशीलतेच्या शेवटाचा आवाज कोणी ऐकत नाही.तो फक्त जाणवतो.तो एक शेवट नसतो, तो नवीन सुरुवातीचा शांत, सामर्थ्यवान, आत्ममूल्याचा क्षण असतो…
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा