संगत जीवनाला घडवणारी अदृश्य शक्ती.....!
संगत जीवनाला घडवणारी अदृश्य शक्ती.....!
मानवाच्या जीवनात काही गोष्टी शब्दांनी समजत नाहीत, त्या अनुभवातूनच उमजतात. संगत ही त्यातीलच एक मौल्यवान गोष्ट. माणूस कसा घडतो, त्याच्या मनाचा स्वभाव कसा तयार होतो, निर्णयांची गुणवत्ता कशी वाढते किंवा कमी होते.याचं मूळ बहुतांश वेळा संगतीत असतं.
बाभळीच्या काट्यांनी वेढलेल्या केळीच्या झाडाची फाटलेली, जखमी पानं पाहिल्यावर मनाला जाणवतं
निसर्गात ही संगतीचा नियम तितकाच कठोर आहे. कधी कधी एखादी चुकीची जवळीक, चुकीचं वातावरण, चुकीची माणसं आपल्या स्वभावाला, मनाला, अस्तित्वालाच टोचू लागतात आणि कळत-नकळत आपली वाढ थांबवतात.
याच्या विरुद्ध, चंदनाच्या झाडाची संगत लाभलेलं साधं लिंबाचं झाडही स्वतःला सुगंधित करून टाकतं. लिंबाची शांत, साधी, कडूसा असणारी फळं चंदनाच्या सौंदर्याने उजळून निघतात.हीच तर चांगल्या संगतीची ताकद
सुगंध स्वतःजवळ ठेवत नाही, तर ज्या कुणाला स्पर्शते त्यालाही सुगंधित करून टाकते.
धर्म-इतिहासातही संगतीचे सामर्थ्य किती उंच आहे हे वारंवार दिसतं.रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला.
स्वतःचं सामर्थ्य त्याला होतं; पण त्या सामर्थ्याला दिशा देणारा रामासारखा सखा होता म्हणून हनुमानाचा तेजोमय इतिहास घडला.
कृष्णाच्या संगतीने अर्जुन सर्वोत्तम योद्धा झाला.
अर्जुनाकडे कौशल्य होतं, पण धैर्य ढळलं… विचार गोंधळले. तेव्हा कृष्णासारख्या मित्राने त्याच्या मनातील अंधार दूर करून त्याला त्याच्या खऱ्या तेजाची ओळख करून दिली.
आणि त्याच वेळी दुर्योधनाच्या संगतीने कर्ण आणि भीष्मासारखे अपार सामर्थ्यवान योद्धेसुद्धा विनाशाकडे गेले.त्यांचा दोष नव्हता; पण चुकीच्या व्यक्तींची
जवळीक, चुकीच्या मार्गावरचा ठाम विश्वास, आणि चुकीच्या विचारांचा सहवास त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते.मन जितकं नाजूक असतं, तितकंच ते प्रभावशीलही असतं.आपण ज्याच्या सहवासात वाढतो, त्याच्या बोलण्याचं, वागण्याचं, विचारांचं प्रतिबिंब आपल्यात पडतं.आपल्या सवयी बदलतात, विचारांचे रंग बदलतात, आणि नकळत आपलं आयुष्यही बदलतं.
संगती ही जणू पाण्याचं भांडं आहे.त्या भांड्यात दूध असेल तर आरशात आपल्याला शुभ्रता दिसते,आणि विष असेल तर त्याचा घातक प्रतिबिंब आपल्या जीवनाला ग्रासू लागतं.
म्हणूनच संगती निवडा, कारण तीच तुमचं भविष्य निवडते.चांगल्या लोकांची साथ माणसाला उंच भरारी देते.त्यांच्या बोलण्यातून प्रेरणा मिळते,त्यांच्या विचारांतून प्रकाश सापडतो,त्यांच्या सहवासातून मन परिपक्व होतं.
तर वाईट संगती माणसाला नकळत खोल दरीत ढकलते
विचार दूषित करते,आत्मविश्वास कमी करते,आणि जीवनाची वाटच नव्हे तर मनाचाही प्रवास वाकवून टाकते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा