स्वभाव ओळखणे हीच खरी कला....!
स्वभाव ओळखणे हीच खरी कला....!
मनुष्याच्या आयुष्यात अनेक नाती येतात.काही फुलांसारखी सुगंध देणारी, तर काही काट्यांसारखी जखमा देणारी. आपण ज्या प्रत्येक व्यक्तीला भेटतो, त्या प्रत्येकाच्या वागण्यात काही वेगळेपण असते. हे वेगळेपणच पुढे जाऊन त्यांचा स्वभाव बनतो. आणि स्वभाव… तो असा असतो की, कितीही प्रयत्न केले, कितीही प्रेम दिले, कितीही समजुतीने समजावले, तरीही तो बदलत नाही.जसे म्हणतात “गाढवाच्या पाठीवर कितीही हात फिरवला तरी तो संधी साधून लाथ मारतोच…!”
काही लोकांत सुरुवातीपासूनच एक हट्टीपणा दिसतो. त्यांच्याशी कितीही प्रेमाने बोला, तरी ते स्वतःच्या जगात रमलेले राहतात. त्यांचे तत्त्व, विचार आणि राग तेच त्यांच्या आयुष्याचे शासक असतात. आपण कितीही संयमाने, शांतपणे त्यांना त्यांची चुका दाखवून देत असलो, तरी त्यांच्या मनाचा दरवाजा बंदच राहतो. अनेकदा आपण स्वतःला बदलतो.आपली बोलण्याची पद्धत बदलतो, आपले वर्तन बदलतो.फक्त एवढ्यासाठी की कदाचित समोरची व्यक्ती बदलून जाईल. पण शेवटी जाणवते की आपण फक्त स्वतःलाच थकवत आलो आहोत.
मानवी नात्यांमध्ये एकच मोठा भ्रम असतो.“मी त्याला/तिला बदलू शकतो.”पण खरे तर प्रत्येकाचा स्वभाव त्याने आयुष्यभर पाहिलेल्या अनुभवांवर, त्याने सोसलेल्या दु:खांवर, त्याला मिळालेल्या संस्कारांवर आणि अंतर्मनातील अव्यक्त भीतीवर उभा राहतो. हा स्वभाव म्हणजे वर्षानुवर्षे भिंतीवर सुकत चाललेला रंगसंगतीसारखा आहे. त्या रंगावर कितीही वेळा दुसरा रंग लावला तरी मूळ रंग कायम राहतो.
कधी कधी आपण समोरच्याच्या चुकीच्या वागण्यावर रागवतो, दुखावतो…पण काही लोकांसाठी लोकांचे मन दुखावणे हा स्वभावच बनलेला असतो. ते जाणूनबुजून दुखवत नाहीत; त्यांना फक्त दुसऱ्याच्या भावना समजण्याची क्षमता नसते. अशा लोकांना कितीही प्रेम दिले तरी ते प्रेम त्यांना दिसतच नाही. ज्या हृदयात समजूतदारपणाच नाही, जिथे संवेदनांची जागा नाही, तिथे प्रेमाची फुले पेरली तरी ती उगवत नाहीत.
स्वभाव बदलणे हे बाहेरून शक्य नाही.तो फक्त व्यक्तीने स्वतःच्या आतून बदलण्याचा निर्णय घेतला तरच बदलतो.एखाद्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवण्याचा आपण केलेला प्रयत्न जर त्याला स्वीकारता आला नाही, तर ते आपले अपयश नाही. कारण नदीला दिशा दाखवण्यासाठी दगड कितीही प्रयत्न करेल, तरी नदी आपला मार्ग स्वतःच ठरवते.
आपल्यापैकी बरेच जण जीवनात अशा व्यक्तींना भेटलेले असतात.कोणी नात्यात, कोणी मैत्रीत किंवा परिचयात. आपण त्यांच्यासाठी खूप काही करतो; त्यांचा राग सहन करतो, कठोर बोलणे पचवतो, दुर्लक्ष स्वीकारतो. आणि शेवटी जेव्हा तेच लोक आपल्याला दुखावतात, तेव्हा जाणवतं की त्यांच्या स्वभावाचं आपण कधीच बदलू शकत नव्हतो; आपण अशक्य गोष्ट साधण्याचा प्रयत्न करत होतो.
जगण्यात एक वेळ येते, जेव्हा आपल्याला काही सत्य स्वीकारावे लागते. त्यापैकी एक सत्य म्हणजे काही लोक फक्त आपल्याला दुखवण्यासाठीच जन्माला आलेले नाहीत; पण त्यांचा स्वभाव तसा बनलेला असतो.
त्यांच्या मनात प्रेम नाही असे नाही; पण ते प्रेम व्यक्त करण्याची, व्यक्तीला जपण्याची, त्याच्या भावना ओळखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. हे सत्य जितक्या लवकर स्वीकारतो, तितकेच जीवन सोपे होते.
स्वभाव बदलू शकत नाही, मग बदलायचं काय?
आपला दृष्टिकोन. आपण कोणाला बदलू शकत नसतो, तरी त्यांच्या वागण्याचा आपल्यावर होणारा परिणाम बदलू शकतो. ज्याच्या स्वभावात दुखावणे असेल, त्याच्याकडून दुखावले जाऊ नये म्हणून स्वतःला अंतर देण्याचं शहाणपण आपल्या हातात असतं.कधी कधी योग्य नातं शोधणं ही बुद्धिमत्ता असते, पण चुकीच्या नात्यापासून मागे हटणं ही परिपक्वता असते.
जीवनात पुढे जाता जाता आपण शिकतो की प्रत्येकाला आपल्यासारख्या भावना नसतात,प्रत्येकाची मनाची रचना सारखी नसते,आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येकाला आपण बदलू शकत नाही.
म्हणूनच शेवटी एक गोष्ट समजते.गाढवाच्या पाठीवर आपण कितीही हात फिरवला, कितीही शांततेने वागलो, कितीही प्रेम दिलं… तरीही तो लाथ मारेल, कारण तेच त्याचं स्वरूप आहे.आणि आपण? आपण फक्त एवढंच करू शकतो.त्या लाथीपासून स्वतःला दूर ठेवण्याचं शहाणपण शिकणं.
स्वभाव न बदलता येणारी गोष्ट असली, तरी स्वभाव ओळखण्याची कला नक्कीच शिकता येते.हीच कला आपल्याला पुढच्या प्रत्येक वळणावर वाचवते.
हा धडा एकदा समजला की मनाला शांतता मिळते.
कारण मग आपण लोकांना ते जसे आहेत तसे स्वीकारायला शिकतो.न बदलण्याची अपेक्षा न ठेवता,
आणि स्वतःला दुखावू न देता.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा