अपयशाच्या सावलीत उमललेली आशा....!
अपयशाच्या सावलीत उमललेली आशा....!
अपयश… एक असा शब्द, जो ऐकतानाच मन थोडंसं खचतं. डोळ्यांसमोर तुटलेली स्वप्नं, अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा आणि स्वतःवरच आलेला राग उभा राहतो. पण खरं सांगायचं झालं, तर ह्याच अपयशाच्या राखेतून संघर्षाची ज्वाला पेटते. कारण ज्याने कधी हरायचं दुःख अनुभवलंय, त्यालाच जिंकण्याची खरी किंमत कळते.
अपयश आपल्याला थांबवत नाही; ते आपल्याला थोडं मागे खेचतं, स्वतःकडे पाहायला लावतं. “नेमकं कुठे चुकलो?” हा प्रश्न विचारायला भाग पाडतं. आणि हाच प्रश्न पुढील प्रवासाची दिशा ठरवतो. यश सहज मिळालं, तर त्याची नशा असते; पण संघर्षातून मिळालेलं यश आत्म्याला भिडतं. कारण त्या यशामागे अश्रूंचे थेंब, झोप न लागलेल्या रात्री आणि स्वतःशी केलेली शांत लढाई दडलेली असते.
ज्याच्या पाठीशी अपयशाची कथा असते, त्याची लेखणी अधिक प्रामाणिक होते. शब्दांमध्ये अनुभवाचा भार असतो. प्रत्येक ओळीत वेदनेची आठवण असते, पण त्याचबरोबर आशेची ठिणगीही असते. अशा माणसाला माहीत असतं.आजचा अंधार कायमचा नसतो. कारण तो आधीही कोसळलाय आणि पुन्हा उभाही राहिलाय.
संघर्षाची गाथा लिहिताना तो स्वतःलाच धीर देतो. “मी अपयशी ठरलो होतो, पण संपलो नव्हतो,” हे तो ठामपणे सांगतो. अपयश त्याला नम्र बनवतं, जमिनीवर पाय ठेवायला शिकवतं. आणि यश आलं, तरी ते गर्वाचं न होता कृतज्ञतेचं असतं.
खरं तर अपयश ही शिक्षा नाही; ती शिकवण आहे. ती आपल्याला आतून मजबूत करते. म्हणूनच, ज्याच्या पाठीशी अपयशाची कथा असते, त्याला संघर्षाची गाथा लिहायला हुरूप येतो. कारण त्याला माहीत असतं.ही गाथा केवळ शब्दांची नाही, तर जगण्याची आहे. आणि अशी गाथा वाचणाऱ्याला ही उभं राहायला शिकवते… पुन्हा, नव्या आशेने.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा