हसऱ्या चेहऱ्यामागची फसवी साथ....!
हसऱ्या चेहऱ्यामागची फसवी साथ....!
आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक आपल्या सोबत चालताना दिसतात. गर्दीत आपण कधी एकटे आहोत याची जाणीवही होत नाही. पण अनुभव सांगतो. सोबत असणं आणि खरी साथ देणं यात फार मोठा फरक असतो.
काही माणसं बाहेरून इतकी आपलीशी वाटतात की त्यांच्या शब्दांवर, हसण्यावर, काळजीवर सहज विश्वास बसतो. पण त्या आपुलकीच्या आड स्वार्थाची थंड गणितं सुरू असतात. त्यांचं हसणं मनापासून नसतं, ते गरजेपुरतं असतं. त्यांचे शब्द गोड असतात, कारण त्यामागे भावना नसून उद्देश लपलेला असतो. काही चेहरे मुखवटे असतात, तर काही शब्द अलगद अडकवणारे सापळे.
खोटी साथ कधीच थेट दुखावत नाही. ती आधी मनात घर करते. तुमचा विश्वास जिंकते, तुमच्या भावना ओळखते, तुमच्या कमकुवत जागा शोधते. त्यांना माहीत असतं. जवळीक जितकी वाढेल तितका घाव खोल बसेल. म्हणूनच ते जास्त गोड बोलतात, जास्त काळजी दाखवतात, कारण विश्वास हा त्यांचा सर्वात मजबूत शस्त्र असतो.
अशा लोकांना तुमचं यश सहन होत नाही. कारण यश तुम्हाला स्वावलंबी बनवतं. पण तुमची कमजोरी त्यांना हवी असते कारण तिथेच त्यांचा फायदा असतो. तुमच्या मनात जागा मिळवणं हा त्यांचा पहिला डाव असतो, आणि त्या जागेतूनच ते तुमच्या आयुष्यावर हळूहळू पकड मिळवतात.
विश्वासघात हा कधीच अचानक होत नाही. तो छोट्या छोट्या गोष्टींमधून तयार होत जातो. वेळेवर साथ न देणं, गरज असताना दूर राहणं, आणि अडचणीत असताना गप्प बसणं.आणि जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त आधाराची गरज असते, तेव्हाच हेच लोक शांतपणे पाठ फिरवतात. त्या क्षणी वेदना केवळ त्यांच्या जाण्याच्या नसतात, तर आपण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला याची असतात.
म्हणूनच, सगळे सोबत आहेत म्हणून निश्चिंत राहू नका. गर्दी म्हणजे आपुलकी नसते, आणि गोड शब्द म्हणजे नातं नसतं. खरी माणसं फार कमी असतात. पण ती कमी असली तरी आयुष्याला आधार देणारी असतात. जी तुमच्या यशात नाही, तर तुमच्या संघर्षात तुमच्या पाठीशी उभी राहतात. जी बोलण्यापेक्षा सोबत राहणं महत्त्वाचं मानतात.
खोटी साथ आयुष्याला जखमा देते, पण त्याच जखमा आपल्याला माणसं ओळखायला शिकवतात. स्वतःला जपायला शिकवतात. आणि सर्वात महत्त्वाचं खऱ्या माणसांची किंमत कळायला शिकवतात. कारण शेवटी, आयुष्यात जगायला खूप लोकांची नाही, तर मुठभर पण मनापासून सोबत देणाऱ्या माणसांचीच गरज असते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा