आपली चूक नसताना…..!
आपली चूक नसताना…..!
आपली चूक नसताना मनावर आलेलं ओझं फार वेदनादायी असतं. कारण ते ओझं आपण कमावलेलं नसतं, तरीही ते वाहावं लागतं. दुसऱ्याच्या चुकीमुळे मन दुखावलं जातं, पण शिक्षा मात्र आपण स्वतःलाच देतो. सतत स्वतःला प्रश्न विचारत राहतो. “आपणच काहीतरी चुकीचं केलं का?” या प्रश्नाचं उत्तर अनेकदा नाही असतं, तरीही मन मान्य करत नाही.
सगळं आपल्या हातात नसतं, हे स्वीकारणं कठीण असतं. आपण प्रामाणिक राहिलो, मनापासून प्रयत्न केला, तरी समोरचा माणूस चुकीचं वागू शकतो. कारण लोकांचं वागणं आपल्या स्वभावावर नाही, तर त्यांच्या विचारांच्या मर्यादांवर अवलंबून असतं. कुणाची असुरक्षितता, कुणाचा अहंकार, कुणाचं अपूर्णपण याचा फटका आपल्या मनाला बसतो, आणि आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. हेच तर सर्वात मोठं दुःख असतं.
प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच जबाबदार धरणं मनाला थकवतं. सतत स्वतःच्या चुका शोधणारा माणूस हळूहळू स्वतःवरचा विश्वास गमावतो. अपराधभावनेचं ओझं मनावर साचत जातं आणि शांतता हरवून बसते. पण आपण प्रामाणिक असू, मन स्वच्छ असेल, तर शांत राहण्याचा आपला पूर्ण हक्क असतो. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही; ते स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं आहे.
सगळ्यांना समजावून सांगायची गरज नसते. काही लोक समजून घेण्यासाठी नसतातच. ते ऐकायला नाही, तर चुकीचा अर्थ लावायला तयार असतात.अशा लोकांसमोर स्वतःला सिद्ध करत बसणं म्हणजे आपल्या आत्मसन्मानावर घाव घालणं.आपली बाजू स्वच्छ असेल, तर मौन हेच सर्वात सशक्त उत्तर ठरतं.
वेळ आणि सत्य यांची जोडी कुणालाही चुकत नाही. आज नाही तर उद्या, सत्य स्वतःहून पुढे येतंच त्या प्रवासात आपल्याला फक्त एक गोष्ट जपायची असते.
स्वतःचा सन्मान. उगाचच मनात अपराधभावना बाळगणं म्हणजे स्वतःशी अन्याय करणं आहे. आपण इतरांसाठी जितकं समजून घेतो, तितकंच स्वतःसाठी ही घेणं गरजेचं आहे.
स्वतःचा सन्मान स्वतःच जपायला हवा. कारण जो स्वतःला जपतो, तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. आपली चूक नसताना शांत राहणं सोपं नसतं,पण तीच खरी ताकद असते. त्या शांततेत आत्मविश्वास असतो, स्थैर्य असतं आणि स्वतःवरचा ठाम विश्वास असतो.
आपली चूक नसताना स्वतःला दोष देणं थांबवा. मनाला थोडी विश्रांती द्या. कारण आपण योग्य असलो, तर शांत राहणं ही कमजोरी नाही, तर आयुष्यात मिळवलेली सगळ्यात मोठी जिंकणं असते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा