उधार यशाची व्याजासकट परतफेड....!


उधार यशाची व्याजासकट परतफेड....!

नियती कुणालाच सोडत नाही मित्रा…हे वाक्य ऐकायला कठोर वाटतं, पण आयुष्याच्या प्रवासात त्याचं सत्य हळूहळू उलगडत जातं. कारण नियती आरडाओरडा करत नाही, ती शांतपणे पाहत राहते.माणसाची वागणूक, त्याचे शब्द, आणि त्याने दिलेल्या जखमा.

काही लोक नाती विसरतात, भावना पायदळी तुडवतात, विश्वास घातालाच शहाणपण समजतात. क्षणभर ते यशस्वी दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या आयुष्याचा झगमगाट लोकांना भुरळ घालतो. पण ते हसू खोलवर पोहोचत नाही. कारण ते बाहेरचं असतं… आत मात्र अस्वस्थतेचा कोलाहल सुरू असतो.

आयुष्याचा हिशोब लगेच होत नाही. तो वेळ घेतो. कारण वेळच खरी न्यायाधीश असते.निःपक्षपाती, न चुकणारी. आज ज्या भावना दुर्लक्षित केल्या जातात, त्याच उद्या जखम बनून उभ्या राहतात. आज ज्या शब्दांना किंमत दिली जात नाही, तेच उद्या आठवणींमध्ये टोचत राहतात.

माणूस ज्या वर्तनाने जगतो, त्याच वर्तनाची सावली त्याच्या मागे चालत असते. ती सावली कधी उजेडात दिसत नाही, पण अंधारात ती अधिक ठळक होते. कुणाचं मन दुखावून पुढे गेलेला माणूस किती ही पुढे गेला, किती ही मोठा झाला, तरी आतून तो कधीच पूर्ण शांत नसतो. कारण शांतता विकत घेता येत नाही; ती मिळवावी लागते माणुसकीने.

विश्वासघाताचं यश नेहमीच उधार असतं. सुरुवातीला ते सोपं वाटतं, फायदेशीर वाटतं. पण नियती त्याची परतफेड व्याजा सकट घेते.एकटेपणाच्या रात्रींमधून, अपराधीपणाच्या शांततेतून, आणि “जर असं केलं नसतं तर…” या प्रश्नांतून.

आज नाही तर उद्या नियती दरवाजा ठोठावतेच. तेव्हा कारणं चालत नाहीत, सबबी संपतात. उरतात फक्त कर्म… आणि त्यांची आठवण. त्या क्षणी माणसाला कळतं की खरं यश काय असतं आणि खरं अपयश कुठे दडलेलं असतं.

म्हणून माणूस म्हणून जगायला शिका. नाती जपा, भावना समजून घ्या, विश्वास जिवंत ठेवा. कारण शेवटी पैसा, पद, प्रसिद्धी काहीच उपयोगी पडत नाही. नियती समोर उभं राहिल्यावर फक्त एकच गोष्ट तुमच्या बाजूने बोलते तुमची माणुसकी.

कारण शेवटी…हिशोब अटळच असतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !