मानलेल्या नात्यांची खरी उंची....!
मानलेल्या नात्यांची खरी उंची....!
नातं फक्त रक्ताचा धागा नसतो, तर मनाच्या जोडणीचं, विश्वासाचं, आणि सोबत राहण्याचं प्रतीक असतं. आपल्याला अनेकदा वाटतं की रक्ताचे नाते म्हणजे आपुलकीची हमी, पण सत्य हे की रक्त फक्त नात्याची ओळख जोडते; त्यात प्रेम आणि समजूतदारपणा नसल्यास ते नाते फक्त नावापुरतं राहते.
जेव्हा अपेक्षा तुटतात, जेव्हा जवळचे दूर जातात, तेव्हा वेदना प्रचंड वाटतात.अशावेळी मानलेली नाती आपल्यासाठी आभाळापेक्षा मोठी वाटतात. कारण ती नाती अधिकारात नाहीत,त्यात गरज आणि खरी ओळख असते. संकटात हात धरून उभं राहणं, दु:खात आपल्या बाजूला असणं हेच खरी नात्यांची कसोटी आहे.
रक्त नातं जोडतो, पण विश्वास टिकवतो नातं.जे मनापासून सोबत असतात, ते आडनाव किंवा प्रतिष्ठेच्या बंधनात अडकत नाहीत; ते फक्त आधार देतात. स्वार्थ संपल्यावर रक्ताची नातीही बदलू शकतात.हे कटू सत्य आहे.
पण निस्वार्थी माणसं आपलं दुःख स्वतःचं मानतात, इतरांना त्रास देत नाहीत, फक्त हात धरतात, साथ देतात, आणि आपली माया उघड करतात.म्हणून नात्यांची मोजदाद रक्तावर नाही, तर वागणुकीवर करा. संकटात जो उभा राहतो, जो आपल्या वेदना सामायिक करतो, जो निस्वार्थपणे साथ देतो, तोच खरा मित्र, खरा स्नेही, खरा नातेवाईक ठरतो. हीच नाती आपल्या जीवनाला खरी उंची देतात.
नातं जपलं जातं तेव्हा त्याची खरी किंमत समजते. जे मनापासून साथ देतात, जे आपलं दुःख सामायिक करतात,आणि जे आपल्याला उभं राहायला शिकवतात ते नाते आयुष्यभराची अमूल्य देणगी बनतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा