आपली शर्यत ओळखा….!



आपली शर्यत ओळखा….!

आयुष्य म्हणजे एक अखंड शर्यत आहे असं आपण नेहमी म्हणतो.पण खरी शोकांतिका इथेच सुरू .आपण शर्यत धावतो, पण ती आपली आहे की नाही हे होते. तपासायलाच थांबत नाही. प्रत्येकजण धावत आहे. म्हणून आपणही धावतो, प्रत्येकजण जिंकायचा प्रयत्न करतो म्हणून आपणही जिंकायच्या मागे लागतो. पण या सगळ्यात एक प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो.आपण कोण आहोत? आणि आपली खरी ताकद नेमकी कुठे आहे?

घोडा आणि कुत्रा यांचं उदाहरण हे फार साधं वाटतं, पण त्यात आयुष्याचं खोल तत्त्व दडलेलं आहे. घोडा हा ताकदीसाठी,सौंदर्यासाठी,वेगासाठी आणि अभिमानासाठी ओळखला जातो. त्याची धाव ही केवळ स्पर्धा नसते, ती त्याच्या अस्तित्वाची घोषणा असते. पण तोच घोडा जर कुत्र्यांच्या शर्यतीत उतरला, तर तिथे त्याचं काय होईल? कदाचित तो जिंकेलही, पण तिथे त्याला घोडा म्हणून ओळख मिळेल का? नाही. तिथे तो फक्त नियमात बसणारा एक घटक ठरेल. त्याची ओळख, त्याचं वेगळेपण, त्याची अस्मिता हळूहळू पुसली जाईल.

माणसाचं आयुष्यही यापेक्षा वेगळं नाही. प्रत्येक माणूस वेगळ्या क्षमतेनं, वेगळ्या स्वप्नांनी आणि वेगळ्या गतीनं जन्माला येतो. कुणी विचारांनी श्रीमंत असतो,कुणी कष्टांनी, कुणी संयमाने तर कुणी कल्पकतेने. पण तरी सुद्धा आपण सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत राहतो. तुलना माणसाला वेगवान करत नाही, ती त्याला दिशाहीन करते. कारण त्या तुलनेत आपण आपला मार्ग विसरतो आणि दुसऱ्याचा मार्ग आपला आहे असं समजून धावायला लागतो.

दुसऱ्यांच्या मैदानात उतरलं की स्वतःचं अस्तित्व हळूहळू संपायला लागतं.तिथे आपल्याला आपली किंमत ठरवता येत नाही, कारण मोजमापच वेगळं असतं. आपल्यात जे विशेष आहे ते तिथे निरुपयोगी ठरतं आणि जे आपल्यात कमी आहे तेच मोठं भासायला लागतं.मग मनात न्यूनगंड घर करू लागतो. आपण स्वतःवरच विश्वास ठेवणं सोडून देतो. हळूहळू आपली ओळख फक्त “इतरांसारखा” इतकीच उरते.

घोडा जिंकण्यासाठी नव्हे तर आपली ओळख जपण्यासाठी पळत असतो. त्याची धाव ही स्वतःशी प्रामाणिक असते. तो कुणाला मागे टाकण्यासाठी धावत नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावतो.पण कुत्र्यांच्या शर्यतीत पळताना त्याचं बळ व्यर्थ जातं. कारण तिथे त्याची ताकद ओझं ठरते आणि त्याची उंची अडथळा बनते. हेच माणसाच्या आयुष्यात घडतं, जेव्हा तो स्वतःची शर्यत विसरून दुसऱ्यांच्या शर्यतीत धावतो.

आजच्या जगात “सगळ्यांसारखं” होण्याची चढाओढ लागली आहे. सगळे जिथे जातायत तिथेच जायचं, सगळे जे करतात तेच करायचं, सगळ्यांसारखंच यश मिळवायचं या नादात माणूस स्वतःला हरवतो. आपलं मन जे सांगतं, आपली क्षमता जिथे खुलते, ते सगळं मागे पडतं. समाजाच्या अपेक्षा, लोकांची मतं आणि तुलना यांचं ओझं वाहत आपण जगायला लागतो.

स्वतःच्या क्षमतेला साजेसं मैदान निवडणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. याचा अर्थ कमी महत्त्वाकांक्षा ठेवणं नव्हे, तर योग्य दिशेनं मोठं स्वप्न पाहणं आहे. प्रत्येकाचं यश वेगळं असतं. कुणासाठी यश म्हणजे प्रसिद्धी, कुणासाठी समाधान, तर कुणासाठी शांत झोप. यशाचं एकच मोजमाप असू शकत नाही, कारण माणसांची स्वप्नंच वेगवेगळी असतात.

तुमचा वेग वेगळा आहे तो कमी नाही, तो तुमचा आहे. तुमचा मार्ग वेगळा आहे.तो चुकीचा नाही, तो तुमचा आहे. तुमचं ध्येय वेगळं आहे.ते लहान नाही, ते तुमचं आहे. योग्य ठिकाणी योग्य प्रयत्न केले तरच ओळख टिकते. नाहीतर जिंकून ही हरल्यासारखं वाटत राहतं.

म्हणून सगळ्यांसारखं व्हायचं नादात स्वतःला हरवू नका. स्वतःची ओळख, स्वतःची ताकद आणि स्वतःचा मार्ग यांचा सन्मान करा. कारण आयुष्याच्या शेवटी पदकं, तुलना किंवा लोकांच्या टाळ्या नाही, तर आपण स्वतःशी किती प्रामाणिक राहिलो हेच महत्त्वाचं असतं.

आपली शर्यत ओळखा. कारण अस्तित्व जपणं हेच खऱ्या अर्थाने जिंकणं आहे. आणि जो माणूस स्वतःची शर्यत ओळखतो, तो कधीही हरत नाही.तो फक्त स्वतःसारखा राहतो, आणि तेच त्याचं खरं यश असतं.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !