अपमानाच्या सावलीत गमावलेलं स्वतःपण....!

अपमानाच्या सावलीत गमावलेलं स्वतःपण....!

जिथे मान राखला जात नाही, तिथे थांबणं म्हणजे हळूहळू स्वतःला मिटवत जाणं असतं. सुरुवातीला ते फक्त शब्द असतात, कधी दुर्लक्ष, कधी उपहास, कधी शांतपणे केलेला अपमान. पण काळ जसजसा पुढे सरकतो, तसं ते शब्द मनावर ओरखडे काढू लागतात. माणूस हसत राहतो, वागत राहतो; पण आत कुठेतरी तो रोज थोडासा तुटत असतो.

आदर मागून मिळत नाही. तो कुणाच्या कृपेनं दिले जाणारे दान नाही.आदर हा वागण्यातून उमटतो.
डोळ्यांतल्या सन्मानातून, शब्दांच्या सौम्यतेतून, आणि ऐकून घेण्याच्या तयारीतून. जिथे शब्दांपेक्षा आवाज मोठा असतो, तिथे मन कायम दबलेलं राहतं. तिथे स्वतःचं मत मांडताना धडधड वाढते, चूक नसताना ही अपराधी वाटू लागतं.

अपमान जर सवय बनली, तर आत्मसन्मान नकळत गळून पडतो. सुरुवातीला आपण स्वतःलाच समजावतो “चालतंय”, “त्यांचा स्वभावच असा आहे”, “मीच adjust करतो”. पण adjust करत करत एक दिवस लक्षात येतं की आपण स्वतःपासूनच दूर गेलो आहोत. नातं असो, कामाची जागा असो किंवा मैत्री मान नसेल, तर ते नातं आधार न राहता ओझं बनतं.

सहनशीलता ही मोठी गुणवैशिष्ट्य आहे; पण स्वतःला गमावणं ही त्याची किंमत असू नये. प्रत्येक वेळी गप्प राहणं हे शहाणपण नसतं. कधी कधी गप्प राहणं म्हणजे अन्यायाला मुकसंमती देणं असतं. आणि अन्याय सहन करत राहिल्यावर तो अन्यायच आपली ओळख बनू लागतो.

स्वतःचा मान राखण्यासाठी कधी कधी दूर जाणं गरजेचं असतं. दूर जाणं म्हणजे पळ काढणं नाही; ते स्वतःला वाचवणं असतं. जिथे तुम्हाला कमी लेखलं जातं, तिथे तुमचं अस्तित्व हळूहळू पुसलं जातं. तुमच्या भावना, तुमचे प्रयत्न, तुमचं मोल सगळंच नगण्य ठरवलं जातं.

आदर देणाऱ्या माणसाकडे आपण परत परत जातो, कारण तिथे मनाला विश्रांती मिळते. तिथे आपण जसे आहोत तसे स्वीकारले जातो. पण अपमान देणाऱ्या जागेपासून एकदाच, कायमचा निघून जाणं हेच योग्य ठरतं. कारण जिथे मान राखला जात नाही, तिथे मन कधीच सुरक्षित राहत नाही.

आणि मन सुरक्षित नसेल, तर कोणतीही जागा, कोणतं ही नातं आपलं वाटत नाही.स्वतःचा मान जपा कारण तोच तुमच्या अस्तित्वाचा खरा पाया आहे.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !