जवखेडे खुर्द : ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी

जवखेडे खुर्द : ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी

अंजनी नदीच्या काठावर वसलेले जवखेडे खुर्द हे गाव ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे. निसर्गरम्य परिसर, सुपीक जमीन व मुबलक पाणी यांमुळे हे गाव प्राचीन काळापासून मानवी वस्तीला अनुकूल ठरले आहे.

इ.स. १६१३ मध्ये जसवंतसिंह देवडा (देवरे) यांनी जवखेडे खुर्द येथे आगमन करून मारुती गढीची उभारणी केली व गावाची अधिकृत स्थापना केली. त्यापूर्वीही विविध समाजांचे लोक या परिसरात वास्तव्यास होते; मात्र त्यांची वस्ती स्थायी स्वरूपाची नव्हती. जसवंतसिंह यांच्या आगमनानंतर गावाला संघटित स्वरूप प्राप्त झाले.

जवखेडे खुर्द हे गाव जसवंतसिंह यांना वतनदारी स्वरूपात प्राप्त झालेले होते, त्यामुळे हे गाव जिल्ह्यात जमीनदारीसाठी प्रसिद्ध झाले. एक काळ असा होता की येथील एक शेतकरी तब्बल दोन हजार एकर जमिनीचा शेतसारा भरत असे, ही बाब गावाच्या समृद्धीची साक्ष देणारी होती.

शैक्षणिक क्षेत्रातही या गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जुन्या काळात पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या समकालीन शिक्षण घेतलेले  विद्यार्थी गावात होते, ही गोष्ट गावाच्या बौद्धिक प्रगतीचे द्योतक होती.

अंजनी नदीच्या कृपेमुळे पाण्याची कमतरता कधीच भासली नाही. त्यामुळे जवखेडे खुर्द हे बागायतदार गाव म्हणून ओळखले जाते. चार गावांच्या संयुक्त सहभागातून स्थापन झालेल्या अंजनी विकास सोसायटीवर या गावाचा लक्षणीय प्रभाव आहे.

शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय असला तरी काळानुरूप शिक्षण, साहित्य, नोकरी, व्यवसाय व प्रशासन क्षेत्रातही गावातील नागरिकांनी प्रगती साधली आहे. भारतीय सैन्यदलात गावातील सुमारे पंचवीस अधिक जवान सेवा बजावत (होते) असून, देशसेवेत जवखेडे खुर्द गावाचा उल्लेखनीय वाटा आहे.

सांस्कृतिक व धार्मिक दृष्ट्याही हे गाव समृद्ध आहे. ऐतिहासिक मारुती गढी, सुंदर विठ्ठल मंदिर, झाडांनी वेढलेली स्मशानभूमी, महापुरापासून संरक्षणासाठी उभारलेली दगडी भिंत, अंजनी थडीचा हिरवागार परिसर तसेच सुमारे सत्तर टक्के घरांची काँक्रीटची बांधकामे ही गावाची वैशिष्ट्ये आहेत.

लोकसंख्येच्या दृष्टीने पाहता, अनेक समाजांचे लोक येथे सलोख्याने नांदत आहेत. सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य व परंपरेचा आदर ही या गावाची खरी ओळख आहे.

आज जवखेडे खुर्द हे गाव इतिहास, परंपरा व आधुनिकतेचा सुंदर संगम साधत विकासाच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे जात आहे.

@ ʲᵃʸᵈᵉᵉᵖ ⁿᵃʳᵉⁿᵈʳᵃ ᵖᵃᵗᶦˡ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !