विश्वासाचं फळ....!
विश्वासाचं फळ....!
विश्वास म्हणजे नुसता शब्द नाही, तो मनाचा एक नाजूक धागा असतो. हा धागा आपण कोणाच्या तरी हातात देतो तेव्हा त्यामागे अपेक्षा नसते,तर एक शांत विश्वास असतो.की समोरची व्यक्ती आपली भावना जपेल. शंका न करता दिलेला विश्वास हा सहज दिला जात नाही; तो मनाच्या खोल पातळीवरून येतो. आणि म्हणूनच तो आपली परीक्षा घेतो.
ही परीक्षा कठोर असते, पण अन्यायकारक कधीच नसते. कारण तिचा निकाल दोनच मार्गांनी समोर येतो. कधी आयुष्यभरासाठी सोबत करणारी,मन ओळखणारी, आपल्याला आपलंसं मानणारी एक चांगली व्यक्ती भेटते. आणि कधी असा अनुभव मिळतो, जो मनाला दुखावतो, डोळ्यांत पाणी आणतो, पण आयुष्यभरासाठी एक अमूल्य धडा देऊन जातो.
विश्वास ठेवणं ही कमजोरी नाही; ती धाडसाची, प्रामाणिकपणाची आणि माणुसकीची खूण आहे. फसवणूक झाली म्हणून विश्वास चुकीचा ठरत नाही. उलट, त्या क्षणी समोरच्याच व्यक्तीचा खरा चेहरा दिसून येतो. आपण कोणावर विश्वास ठेवला, यासाठी स्वतःला दोष देणं म्हणजे आपल्या निर्मळ मनालाच शिक्षा देणं ठरतं.
चांगली व्यक्ती मिळाली तर आयुष्य समृद्ध होतं. नात्यांना अर्थ मिळतो, मनाला आधार मिळतो, आणि जग थोडं अधिक आपुलकीचं वाटू लागतं.आणि जर धडा मिळाला, तर आयुष्य शहाणं होतं.अनुभव आपल्याला सावध करतो, अधिक समजूतदार बनवतो, आणि पुढच्या नात्यांमध्ये स्वतःची किंमत ओळखायला शिकवतो.
खरं पाहिलं तर या दोन्ही परिस्थितींमध्ये आपलं काहीच नुकसान होत नाही. फक्त आपल्यात बदल होतो. कधी मन अधिक मोठं होतं, तर कधी विचार अधिक खोल होतात. अनुभव कडू असले तरी ते आपल्याला आतून मजबूत करतात. प्रत्येक धडा पुढच्या नात्यांसाठी भान देऊन जातो.काय स्वीकारायचं आणि काय टाळायचं, हे शिकवतो.
म्हणूनच विश्वास ठेवताना भीती बाळगू नका. भीतीमुळे मन आकसतं, पण विश्वासामुळे मन विस्तारतं. जरी कधी वेदना मिळाल्या, तरी त्या वेदना आपल्याला अधिक खरे, अधिक संवेदनशील माणूस बनवतात.शेवटी, विश्वासातून जे काही मिळतं ती व्यक्ती असो किंवा तो धडा ते नक्कीच मोलाचं असतं. कारण तेच आपल्याला आयुष्य समजायला, आणि स्वतःला ओळखायला शिकवतं.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा