ओठांवर हसू, पोटात काळजी जपायचे कोण....?

ओठांवर हसू, पोटात काळजी जपायचे कोण....?

नवीन वर्ष… नव्या आशा, नव्या स्वप्नांची चाहूल घेऊन येतं. पण या नव्या सुरुवातीला एक शांत, पण महत्त्वाचा संकल्प करायला हवा स्वतःच्या मनाच्या सुरक्षिततेचा.

जग अनुभवातून शिकतं, फसवणुकीतून शहाणं होतं. पण आपण मात्र विश्वास ठेवत ठेवत अनेकदा स्वतःलाच दुखावत राहतो. कारण आपल्याला वाटतं.आपल्या आजूबाजूची सगळी माणसं आपलीच आहेत. पण सत्य तितकंसं सोपं नसतं. इतिहास साक्षी आहे.घात हा नेहमी शत्रूकडून नाही, तर जवळच्या माणसाकडूनच होतो. जिथे डोळे मिटून विश्वास ठेवला जातो, तिथेच विश्वासघाताची शक्यता सर्वाधिक असते.

काही लोकांचे शब्द गोड असतात, पण हेतू कडू. ओठांवर हसू असतं, पण पोटात मात्र वेगळंच काही शिजत असतं. समोर पाठ थोपटणारी हीच माणसं मागे तुमच्याच पायाखाली खड्डे खोदत असतात. त्यांच्या “आपुलकी”त स्वार्थाची धार लपलेली असते, आणि त्यांच्या “सल्ल्या”त तुमच्या अपयशाची चाहूल असते.

आपण चुकतो तेव्हा, जेव्हा वारंवार दुखावलं जाऊनही “कदाचित यावेळी नाही” असं म्हणून पुन्हा विश्वास ठेवतो. मनाचं हृदय फार मोठं असणं ही कमजोरी नाही; पण सगळ्यांसाठी दार उघडं ठेवणं ही नक्कीच चूक आहे. प्रत्येकाला तुमच्या आयुष्याच्या आतल्या खोलीत प्रवेश देणं आवश्यक नसतं.

नवीन वर्ष आपल्याला हे शिकवायला येतं की स्वतःची किंमत ओळखा.ज्यांच्यामुळे मन अस्वस्थ होतं, ज्यांच्यामुळे आत्मविश्वास कमी होतो,ज्यांच्या उपस्थितीत तुम्ही स्वतःसारखे राहत नाही.अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवा. कारण शांत मन, सुरक्षित हृदय आणि स्वच्छ नाती यांच्या शिवाय कोणतंही यश अपूर्णच असतं.

सावध रहा, पण संशयी होऊ नका. समजूतदार बना, पण कठोर होऊ नका. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवा.नवीन वर्षात एवढंच लक्षात ठेवा.जे खरं आहेत ते वेळोवेळी सिद्ध होतील,आणि जे खोटे आहेत ते अंतरामुळेच ओळखू येतील.स्वतःची काळजी घ्या. कारण शेवटी, तुमचं मन जपणं हीच खरी नवी सुरुवात आहे. 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !