न बोललेल्या शब्दांत हरवलेली नाती...!

न बोललेल्या शब्दांत हरवलेली नाती...!

नाती सहसा एका दिवसात तुटत नाहीत. ती तुटतात हळूहळू… अगदी नकळत. मोठे वाद, जोराचे भांडण किंवा कठोर शब्द हे कारण नसतात; खरी सुरुवात होते ती दुर्लक्षातून. बोलणं कमी होतं, भेटी टाळल्या जातात आणि “नंतर पाहू” म्हणत भावना मागे ढकलल्या जातात. तेव्हाच नात्याच्या मुळाशी एक सूक्ष्म तडा जातो.

अहंकार त्या तड्याला वाढवतो.“मला काय फरक पडतो” हे शब्द जरी सहज निघाले, तरी ते नात्यांवर खोल ओरखडे उमटवतात. संवाद थांबतो आणि त्या शांततेत गैरसमज आपोआप जन्म घेतात. न बोललेली दुःखं, न समजलेल्या भावना आणि अपूर्ण अपेक्षा या सगळ्यांचा भार नातं हळूहळू पेलू शकत नाही.

जेव्हा समजून घेण्याऐवजी जिंकण्याची हाव लागते, तेव्हा प्रेम मागे पडतं. नातं मग स्पर्धा बनतं.कोण बरोबर, कोण चूक याचा हिशोब सुरू होतो. माफी मागणं कमीपणाचं नसतं, पण अहंकार ते मान्य करू देत नाही. “मीच का वाकायचं?” या एका प्रश्नात कितीतरी नाती अडकून पडतात.

एकदा मनात अंतर पडलं की ते दिसत नसतानाही सतत जाणवत राहतं. समोर बसूनही दूर वाटणं, शब्द असूनही संवाद न होणं, आणि हसण्यातही पोकळपणा जाणवणं हेच त्या अंतराचं अस्तित्व सांगत असतं. वेळ गेल्यावर उमगतं की भांडण नव्हतं खरं त्रासदायक, तर गप्प राहणं जास्त घातक होतं.

नाती तुटतात तेव्हा कुठलाही मोठा आवाज होत नाही. कुठलीही घोषणा नसते. पण आतून बरंच काही तुटलेलं असतं.विश्वास, आपुलकी, आणि “आपण”पण. जपायचं ठरवलं तर शब्द सापडतात, वेळ काढली जाते, आणि थोडं वाकायला ही मन तयार होतं. पण तोडायचं ठरवलं तर कारणं सहज मिळतात.

नातं टिकवायचं असेल तर ऐकण्याची तयारी हवी फक्त शब्द ऐकण्याची नाही, तर भावना समजून घेण्याची. आणि कधी कधी स्वतःला मागे ठेवण्याची, कारण नातं मोठं असतं, अहंकार नाही. शेवटी नाती जपायची की तोडायची, हे परिस्थितीवर नाही तर आपल्या स्वभावावर अवलंबून असतं.

कारण नाती आपोआप टिकत नाहीत…ती जपावी लागतात.संवादाने, समजुतीने आणि थोड्याशा प्रेमळ मोकळेपणाने.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !