पदाच्या तोऱ्यात हरवलेलं आयुष्य....!
पदाच्या तोऱ्यात हरवलेलं आयुष्य....! कितीही मोठा अधिकारी असो, कितीही प्रसिद्ध समाजसेवक असो पदावर असताना त्याचं जगणं वेगळंच असतं. नावापुढची पदवी, खुर्चीभोवतीचं वलय, लोकांच्या नजरा, शब्दांतली आदराची कंपने… सगळं काही त्याच्यासोबत असतं. पण त्या सगळ्याचा केंद्रबिंदू तो माणूस नसतो, तर त्याचं पद असतं.हे सत्य अनेकांना फार उशिरा उमगतं. एक दिवस येतो, जेव्हा पद सुटतं. कायमचं. फाइल्स, दालनं, शिपाई, गाडीचा ताफा सगळं मागे राहतं. आणि तेव्हाच आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. कारण तेव्हा समाज माणसाकडे पाहतो, पदाकडे नाही. पण जर त्या क्षणानंतर ही तो माणूस “मी काय होतो” या अहंकाराच्या ओझ्याखाली वागत राहिला, माजी पदाच्या तोऱ्यातच बोलू-वागू लागला,तर समाज त्याच्यापासून दूर सरकतो.हळूच, शांतपणे, पण ठामपणे. समाजाला गर्व सहन होत नाही, विशेषतः तो गर्व भूतकाळावर आधारलेला असेल तर. पद गेल्यावर ही जो माणूस अपेक्षा करतो की लोकांनी तसाच मान द्यावा, तशीच भीती बाळगावी, त्याला समजून घ्यायला हवं की तो मान कधीच त्याचा नव्हता. तो पदाचा होता. आणि पदासोबत तो ही निघून गेला. खरं सांगायचं तर, पद हे तात्पुरतं असतं; पण म...