वारशाने मिळालेलं व्यासपीठ आणि स्वतःच्या हिमतीने कमावलेल्या टाळ्या....!
वारशाने मिळालेलं व्यासपीठ आणि स्वतःच्या हिमतीने कमावलेल्या टाळ्या....! जन्मताना आपण कोणत्या घरात जन्माला येतो, हे आपल्या हातात नसतं. काहींना संपत्तीचा वारसा लाभतो, काहींना नावाचा, तर काहींना कर्तृत्ववान आई-वडिलांची ओळख. त्या ओळखीमुळे अनेकदा आयुष्याच्या सुरुवातीला एक सुंदर, सजलेलं व्यासपीठ आपल्यासमोर उभं राहतं. लोकांची नजर आपल्याकडे वळते, दारं आपोआप उघडतात, आणि संधी सहजपणे हाताशी येतात. पण त्या व्यासपीठावर उभं राहणं आणि त्या व्यासपीठावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं यात खूप मोठा फरक असतो.वडिलांचं नाव सांगितल्यावर मिळणारी पहिली ओळख ही कदाचित अभिमानाची असते; पण ती कायम टिकणारी नसते. कारण लोक सुरुवातीला तुमच्याकडे कुतूहलाने पाहतात, पण नंतर ते तुमच्याकडून कर्तृत्वाची अपेक्षा करतात. “अमुक व्यक्तीचा मुलगा/मुलगी” ही ओळख एका टप्प्यापर्यंत साथ देते, पण त्यानंतर जग विचारतं “तुझं स्वतःचं काय?” वारसा आपल्याला संधी देतो, पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी लागणारी मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा आणि चिकाटी मात्र आपल्यालाच दाखवावी लागते. व्यासपीठावर उभं राहणं सोपं असतं; पण लोकांच्या मनात स्थान निर्...