जगाचा पोशिंदा उपाशीच का ?
जगाचा पोशिंदा उपाशीच का ? रात्रभर गडद काळसर आभाळ पसरलेलं असतं, पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते, वाऱ्याचा रुतून वाहणारा आवाज अंगावर काटा आणतो आणि कुठे तरी दूर कावळा ओरडतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याच्या मनात एकच विचार सतत डोकावत राहतो. "आपणच जगाला पोसतो, पण आपल्यासाठी कोण?" एखाद्या माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक घासामागे एक हात असतो.तो म्हणजे शेतकऱ्याचा. जसा आई आपल्या लेकराला दूध देते, तसाच शेतकरी आपल्या श्रमांनी जगाला अन्न पुरवतो. फरक एवढाच, की लेकराच्या डोळ्यांतील दुःख आईला दिसतं, पण शेतकऱ्याच्या डोळ्यांतील वेदना कोणालाच जाणवत नाहीत. शेती म्हणजे केवळ माती नाही, ती शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आई आहे. त्या मातीत तो नुसते बियाणे नव्हे, तर आशा पेरतो. एका दाण्यात पोटभर अन्न होईल, या विश्वासाने तो आभाळाकडे डोळे लावून बसतो. परंतु आभाळ ही अनेकदा रुसून राहतं, आणि मग डोळे पाणावतात. अखेर, माती आणि घाम एकरूप होतात... अनेकदा रक्त देखील त्यात सामावून जातं. शहरातल्या माणसांसाठी शेती ही केवळ नकाशावर दाखवलेली जमीन असते. त्यांना पिकांचे भाव समजतात, पण त्या भावांसाठी जीव तोडण...