पद नसले तरी स्वाभिमान असू द्या....!
पद नसले तरी स्वाभिमान असू द्या....! “तुमच्या नावापुढे पद नसलं तरी चालेल; पण तुमचं मस्तक कोणासमोरही झुकलेलं नसावं.हीच खरी राजसत्ता आहे.” हे वाक्य केवळ शब्दांचा अलंकार नाही, तर ते आयुष्याचा गाभा सांगणारं गहन तत्त्वज्ञान आहे. कारण मनुष्य आयुष्यभर पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी यांच्या मागे धावत राहतो; परंतु या सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत. आज आहेत, उद्या नसतील. काळाच्या ओघात वैभव क्षीण होतं, पदं बदलतात, सत्तेची आसनं रिकामी होतात; पण स्वाभिमान मात्र माणसाच्या अस्तित्वाचा पाया असतो. तो ढासळला, तर सर्व काही असूनही मनुष्य आतून रिकामा होतो. राजा होण्यासाठी सिंहासन लागतं, मुकुट लागतो, दिमाखदार दरबार लागतो.असं आपण मानतो. परंतु खरा राजा तोच असतो,ज्याच्या विचारांत प्रामाणिकपणा असतो, कृतीत सचोटी असते आणि डोळ्यांत भीती ऐवजी आत्मविश्वास झळकत असतो. राजेशाही वेशभूषा नसली तरी चालते; पण स्वभावात राजसता असली पाहिजे. समाजात अनेक व्यक्ती अशा असतात की त्यांच्या नावापुढे कोणतंही मोठं पद नसतं; तरीही त्या उंच भासतात. कारण त्यांनी कधीच स्वतःचा स्वाभिमान विकला नाही. परिस्थिती कठीण असो, संकटं डोईजड अस...