"मातीशी नातं आणि माणुसकीशी जोडलेलं आयुष्य – पांडुरंग गांगोडें"
"मातीशी नातं आणि माणुसकीशी जोडलेलं आयुष्य पांडुरंग गांगोडें" जगण्यात काही माणसं अशी असतात की त्यांच्या थोरपणाची जाणीव त्यांच्या शांत, साध्या आणि संयमी वागणुकीतून नकळत होते. त्यांनी कधीही कीर्तीचा गवगवा केलेला नसतो, पण त्यांच्या अस्तित्वाने अनेक आयुष्यांवर अमिट ठसा उमटलेला असतो. अशाच व्यक्तींमध्ये एक नाव जपून ठेवावं लागेल, ते म्हणजे स्वर्गीय पांडुरंग विठोबा गांगोडे. वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची जीवनयात्रा संपली. त्यांचं निधन केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर त्यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्या सुसंस्कारांशी मनःपूर्वक जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मोठी हानी ठरली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वारे या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि परोपकारी असलेल्या पांडुरंग गांगोडे यांनी आपल्या सेवायात्रेला मंडळ अधिकारी म्हणून सुरुवात केली. कार्यक्षमतेच्या जोरावर ते ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत राहिले. त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात त्यांनी कधीही प्रामाणिकपणा, पारदर्शकता व...